५४ गावांवर पाणीटंचाईचे संकट
By admin | Published: November 22, 2015 02:04 AM2015-11-22T02:04:26+5:302015-11-22T02:04:26+5:30
भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचा निरीक्षण अहवाल; आतापासूनच कराव्या लागणार उपाययोजना.
संतोष वानखडे / वाशिम : यावर्षीच्या अल्प पावसाचा फटका पाणीटंचाईच्या माध्यमातून जिल्ह्यातील ५४ गावांना बसणार असून, पाणीटंचाई निवारणार्थ जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने विहिरीतील भूजल पातळीचे निरीक्षण केल्यानंतर ५४ गावांत पाणीटंचाई निर्माण होण्याचे मत नोंदविले आहे. विविध कारणांमुळे पावसाचे प्रमाण कमी होत आहे. पावसाळ्यातच पाऊस फितूर होत असल्याने साधारणत: हिवाळ्याच्या शेवटच्या महिन्यात काही गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. पाणीटंचाई निवारणार्थ प्रशासन नानाविध उपाययोजना राबविते. कायमस्वरुपी उपाययोजनांचा अभाव, पाण्याचा अपव्यय आणि पावसाचे अल्प प्रमाण यामुळे उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच उन्हाबरोबरच पाणीटंचाईचे चटके गावकर्यांना सहन करावे लागतात. यावर्षी अल्प प्रमाणात पाऊस झाला. जूनमध्ये वेळेवर हजेरी लावणारा पाऊस जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या महिन्यात फितूर झाला. परिणामी, जलसाठय़ांत समाधानकारक वाढ होऊ शकली नाही. जलयुक्त शिवार आणि ह्यआपलं गाव-आपलं पाणीह्ण या उपक्रमांमुळे ३३ गावांत पाण्याची उपलब्धता करण्यात जिल्हा प्रशासनाला यश मिळाले. ५४ गावांतील विहिरींची भूजल पातळी खालावल्याने येथे पाणीटंचाई निर्माण होण्याचे सुतोवाच भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या अहवालाने केले. भूजल सर्वेक्षण विभागाच्या यंत्रणेने जिल्ह्यातील एकूण ७९ विहिरींच्या भूजल पातळीचे निरीक्षण केले. यामध्ये वाशिम व मंगरुळपीर तालुक्यातील प्रत्येकी ११, रिसोड तालुका १८, मालेगाव आठ, मानोरा १५ व कारंजा १६ गावातील विहिरींचा समावेश आहे. या निरीक्षणावरून ५४ गावांवर पाणीटंचाईचे ढग गडद असल्याचे मत भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने नोंदविले आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण अल्प असले तरी भूजलच्या पातळीत घट नसल्याचे निरीक्षणही नोंदविण्यात आले. उपाययोजनांची लगबग सुरू झाली.