दहा महिन्यांनंतर मिळतोय पाणीटंचाईचा निधी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 01:45 AM2018-02-08T01:45:23+5:302018-02-08T01:49:02+5:30
वाशिम : सन २0१६-१७ मधील पाणीटंचाई निवारणार्थ केलेल्या उपाययोजनेचा निधी टँकर मालक व खासगी विहीर मालकांना पंचायत समिती स्तरावरून आता मिळत आहे. टँकरने पाणी पुरवठा व विहीर अधिग्रहण यासाठी ८७.९१ लाख रुपये पंचायत समित्यांना मिळालेले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : सन २0१६-१७ मधील पाणीटंचाई निवारणार्थ केलेल्या उपाययोजनेचा निधी टँकर मालक व खासगी विहीर मालकांना पंचायत समिती स्तरावरून आता मिळत आहे. टँकरने पाणी पुरवठा व विहीर अधिग्रहण यासाठी ८७.९१ लाख रुपये पंचायत समित्यांना मिळालेले आहेत.
गतवर्षी जवळपास २५0 गावांत पाणी टंचाई निर्माण झाली होती. या गावांतील पाणी टंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी टँकरने पाणी पुरवठा तसेच खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले होते. त्यापोटी ८७.९१ लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता होती. वारंवार मागणी करूनही टँकर मालक व विहीर मालकांना निधी मिळत नसल्याचे पाहून यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतील सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. डिसेंबर महिन्यात शासनाकडून जिल्हा प्रशासनाला निधी प्राप्त झाला. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने ६ जानेवारी २0१८ रोजी एकूण ८७ लाख ९१ हजार रुपयांचा निधी जिल्ह्यातील सहाही पंचायत समित्यांना वितरित केला. टँकर तसेच विहीर मालकांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा केली जाणार आहे. त्यासाठी पंचायत समिती स्तरावरून बँक खाते क्रमांक मागविण्यात आले. पडताळणी केल्यानंतर आता टँकर व विहीर मालकांच्या बँक खात्यात रक्कम जमा केली जात आहे. दरम्यान, शासन स्तरावरून निधी मिळण्यास प्रचंड विलंब झाल्याने टँकर व विहीर मालकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. वाशिम तालुक्यात टँकरने पाणी पुरवठय़ासाठी २.५७ लाख तर खासगी विहीर अधिग्रहणसाठी १४.३१ लाख रुपये खर्च झाले होते. हा सर्व निधी पंचायत समितीकडे पाठविण्यात आला असून, संबंधितांच्या बँक खात्यात रक्कम जमा केली जात आहे. मालेगाव तालुक्यात टँकरसाठी १२.३१ लाख तर खासगी विहीर मालकांसाठी १२.५५ लाख रुपये, मंगरूळपीर तालुक्यात टँकरसाठी २.७0 लाख तर विहीर अधिग्रहणासाठी १.२६ लाख रुपये, मानोरा तालुक्यात टँकरसाठी ४.५६ लाख तर विहीर अधिग्रहणासाठी ९५ हजार रुपये, रिसोड तालुक्यात विहीर अधिग्रहणासाठी २३.४९ लाख रुपये आणि कारंजा तालुक्यात टँकरसाठी ९.0३ लाख तर खासगी विहीर मालकांसाठी ४.५0 लाख रुपयांचा निधी पाठविण्यात आला. असा एकूण ८७ लाख ९१ हजार रुपयांचा निधी आता टँकर व विहीर मालकांना मिळत आहे.