मंगरुळपीर तालुक्यात पाणीटंचाई ; शेतशिवारातून बैलबंडीने आणले जातेय पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 02:29 PM2018-04-30T14:29:46+5:302018-04-30T14:29:46+5:30
मंगरुळपीर: तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा अत्यंत तीव्र झाल्या आहेत. ग्रामीण भागामधील जनतेला पिण्यासाठी पाणी मिळेनासे झाले असून, विविध ठिकाणी शेतशिवारातील विहिरीवरून बैलबंडीने पाणी आणून लोक आपली तहान भागवित आहेत.
मंगरुळपीर: तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा अत्यंत तीव्र झाल्या आहेत. ग्रामीण भागामधील जनतेला पिण्यासाठी पाणी मिळेनासे झाले असून, विविध ठिकाणी शेतशिवारातील विहिरीवरून बैलबंडीने पाणी आणून लोक आपली तहान भागवित आहेत. तालुक्यातील शेंदूरजना मोरे येथेही हे भीषण वास्तव पाहायला मिळत आहे.
मंगरुळपीर तालुक्यात गतवर्षी वार्षिक सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस झाला. परिणामी हिवाळ्यापासूनच जनतेला पाणीटंचाईचे चटके सोसावे लागत आहेत. आता या पाणीटंचाईच्या झळा अधिकच तीव्र झाल्या आहेत. रखरखत्या उन्हामुळे गावातील विहिरी, हातपंप कोरडे पडले असून, पिण्याच्या पाण्याचे इतरही पर्याय उपलब्ध नाहीत. त्यामुळे जनतेचे पाण्याविना प्रचंड हाल होत आहेत. तालुक्यातील बहुतांश खेड्यांमध्ये हे गंभीर चित्र पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्यांनी मोफत पाणी पुरवठा सुरू केल्याने संबंधित गावातील ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे; परंतु बºयांच गावात हा उपक्रम राबविण्यासाठी पुरेशे पाणीही उपलब्ध नाहीत. स्वत:च्या कुटुंबाची तहान भागविण्यासाठी काही ग्रामस्थ शेतशिवारातील आटत चाललेल्या विहिरीतून पाणी बादल्यांनी उपसून ते बैलबंडीद्वारे आणत असल्याचे विदारक चित्र मंगरुळपीर तालुक्यातील शेंदूरजना शिवारात पाहायला मिळत आहे. दिवसभराची तहान भागेल आणि इतर काही आवश्यक गरजा पूर्ण होऊ शकतील, एवढेही पाणी दिवसाकाळी विहिरीतून उपसणे शक्य होत नसल्याचेही दिसत आहे.
ग्रामस्थांना चिंता पुढील महिन्याची
सध्या एप्रिल महिना संपला असताना विहिरी ठणठण झाल्या असून, अद्यापही पावसाळ्यासाठी जवळपास दिड महिन्याचा कालावधी उरला आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतरही पाण्याची समस्या तात्काळ मिटेलच अशी शाश्वती नाही. त्यामुळे आगामी दिवसांत पाणीटंचाईची समस्या उग्ररूप धारण करण्याची भिती निर्माण झाली असून, पुढील महिन्यांत पिण्यासाठीही पुरेशे पाणी मिळणार की नाही, ही चिंता ग्रामस्थांना पडल्याचे दिसत आहे. प्रशासनाने विहिरींचे अधिग्रहण करून शेती वा इतर कोणत्याही प्रयोजनासाठी होत असलेल्या पाणी वापरावर तात्काळ बंदी घालावी, अशी मागणी ग्रामस्थांच्यावतीने करण्यात येत आहे.