मंगरुळपीर येथे पाणीटंचाई तीव्र; तात्पुरत्या पाणी पुरवठा योजनेचे काम थंडबस्त्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 01:56 PM2018-03-03T13:56:31+5:302018-03-03T13:56:31+5:30
मोतसावंगा प्रकल्पात पाणी आणण्याच्या तातडीच्या पाणी पुरवठा योजनेला प्राथमिक मंजुरी मिळाली आहे. तथापि, या योजनेला अद्याप अंतिम प्रशासकीय मान्यता मिळाली नाही.
मंगरुळपीर: शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यावर नियंत्रणासाठी मंगरुळपीर पालिकेच्या प्रस्तावानुसार मालेगाव तालुक्यातील सोनल प्रकल्पातून मंगरुळपीर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मोतसावंगा प्रकल्पात पाणी आणण्याच्या तातडीच्या पाणी पुरवठा योजनेला प्राथमिक मंजुरी मिळाली आहे. तथापि, या योजनेला अद्याप अंतिम प्रशासकीय मान्यता मिळाली नाही. त्यामुळे या योजनेला कार्यान्वित होण्यास बराच विलंब लागणार असून, नागरिकांचे पाण्याअभावी प्रचंड हाल होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
मंगरुळपीर शहरातील पाणीटंचाईवर नियंत्रणासाठी तातडीची व तात्पुरती उपाययोजना करण्यासाठी सोनल प्रकल्पातील मृतसाठा मोतसावंगा प्रकल्पात वळविण्यासाठी ४ कोटी १ लाख ८० हजाराचा रुपये खर्चाच्या योजनेचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या योजनेची उपयुक्तता आणि इतर तांत्रिकबाबी पडताळण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधीकरणच्यावतीने सर्वेक्षणही करण्यात आले असून, या संदर्भात पाटबंधारे विभागाकडून जिल्हा प्रशासनाने अहवाल मागितला आहे. त्या अहवालाची पाहणी करण्यात आल्यानंतरच या योजनेला मंजुरी मिळणार आहे. या योजनेचे काम पालिकेच्यावतीने कंत्राटदारामार्फत केले जाणार असल्याची माहिती आहे. आता या योजनेला अद्याप अंतिम मंजुरीच मिळालेली नसून, मंजुरी मिळाल्यानंतर निविदा प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. ही प्रकिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. या योजनेंतर्गत सोनल प्रकल्प ते मोतसावंगा प्रकल्पापर्यंत १२६०० मीटर अंतराची जलवाहिनी टाकली जाणार आहे. त्यामुळे कामाला मोठा कालावधी लागणार असून, अद्याप अंतिम मंजुरीच मिळाली नसल्याने हे काम कधी पूर्ण होईल, हा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यातच सोनल प्रकल्पातील सध्याची मृतसाठ्याची स्थिती पाहतायोजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचा किती फायदा मंगरुळपीर शहराला होईल, याबाबत शंकाच आहे.