वाशिम जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र; उपाययोजनांची व्याप्तीही वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 05:16 PM2019-05-19T17:16:41+5:302019-05-19T17:16:59+5:30
वाशिम : मे महिन्याच्या पंधरवड्यापासून जिल्ह्यात पाणीटंचाईची तिव्रता अधिकच वाढली असून, ही तिव्रता कमी करण्याचा प्रयत्न म्हणून जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यातील ४५ गावांत टँकर तर १८४ गावांत २५३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : मे महिन्याच्या पंधरवड्यापासून जिल्ह्यात पाणीटंचाईची तिव्रता अधिकच वाढली असून, ही तिव्रता कमी करण्याचा प्रयत्न म्हणून जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यातील ४५ गावांत टँकर तर १८४ गावांत २५३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. येथे पिण्याच्या पाण्याचा अपवाद वगळता वापरण्यासाठी पाण्याची टंचाई जाणवत असून, अन्य काही गावातही पाण्यासाठी नागरिकांची पायपिट सुरूच आहे.
गत तीन वर्षांत पावसाचे प्रमाणही कमी झाल्याने पाणीटंचाईची तिव्रता अधिकच वाढत आहे. गतवर्षी पावसाळ्यात पावसाने सरासरी गाठली नाही. परिणामी, आता पाणीटंचाईची दाहकता अधिकच वाढली आहे. उन्हाबरोबरच पाणीटंचाईच्या चटक्याने ग्रामीण भागातील जनता होरपळून जात आहे. पाणीटंचाई निवारण्यासाठी प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी मानोरा तालुक्यात गलमगाव, पाळोदी, रिसोड तालुक्यात भर जहॉगीर परिसर, मालेगाव तालुक्यातील बोराळा, राजूरा यासह डोंगराळ भागातील नागरिक, वाशिम तालुक्यातील माळेगाव, भोयता परिसर, कारंजा तालुक्यातील गिर्डा, बांबर्डा परिसर आदी भागातील नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. नागरिकांची मागणी आणि पाणीटंचाईची दाहकता लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने आता उपाययोजनांची व्याप्ती वाढविल्याचे दिसून येते. सद्यस्थितीत ४५ गावांत टँकर मंजूर असून, १८४ गावांत २५३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. ४५ टँकरमध्ये वाशिम तालुक्यातील १६ गावे, मालेगाव तालुक्यात सात, रिसोड चार, मंगरूळपीर नऊ, मानोरा पाच आणि कारंजा तालुक्यातील पाच गावांचा समावेश आहे. याप्रमाणेच २५३ विहिर अधिग्रहणामध्ये वाशिम तालुक्यात ५९, मालेगाव ३१, रिसोड ५०, मंगरूळपीर ५४, मानोरा १८ आणि कारंजा तालुक्यात ३१ अशा ठिकाणचा समावेश आहे. या टंचाईग्रस्त गावांत टँकर किंवा विहिर अधिग्रहणामुळे नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध होत असले तरी वापरण्यासाठीच्या पाण्याचा प्रश्न कायम आहे. या टंचाईग्रस्त गावांव्यतिरिक्त रिसोड तालु्क्यातील भर जहॉगीर परिसरातील पाच गावे, लोणी परिसरात तीन गावे, कारंजा तालुक्यातील हिवरा, गंगापूर, आखतवाडा, मालेगाव तालुक्यातील शिरपूर परिसरातील तीन गावे आदी गावांमध्येही पाण्यासाठी नागरिकांना दूरवर पायपिट करावी लागत आहे. गावापासून दोन ते तीन किमी अंतरावर असले्ल्या शेतातील विहिरींवरून भर उन्हात पाणी आणण्याची कसरत महिलांना करावी लागत आहे.