हिवाळ्यातच तीव्र पाणीटंचाई; पाण्यासाठी महिलांची वणवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 04:09 PM2018-10-27T16:09:38+5:302018-10-27T16:10:30+5:30
रिसोड: तालुक्यातील महत्त्वाची ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या वाकद येथे हिवाळ्याच्या सुरवातीलाच तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड: तालुक्यातील महत्त्वाची ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या वाकद येथे हिवाळ्याच्या सुरवातीलाच तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. पाणी पुरवठा योजना ठप्प असल्याने महिला किलोमीटर अंतरावरून पाणी आणत गरजा भागवित आहेत. गावात जलस्त्रोत नसल्याने गावालगत असलेल्या तलावरील विहिरीचे दुषित पाणी नागरिकांना प्यावे लागत आहे.
वाकद येथे नळगंगा योजनेद्वारे ग्रामस्थांना पाणी पुरवठा करण्यात येत होता; परंतु ही योजना सहा महिन्यांपासून ठप्प झाल्याने पाणीटंचाईचा सामना ग्रामस्थ करीत आहेत. या ठिकाणी नळ योजनेच्या पाणी पुरवठ्याशिवाय दुसरे कोणतेच जलस्त्रोत नाही. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. गावालगत असलेल्या विहिरीवरून लोक पाणी आणून गरजा भागवित आहेत. त्यापैकी गावलगतच्या तलावाजवळ असलेल्या विहिरीचे पाणी दुषित झाले आहे; परंतु वार्ड क्रमांक १ मधील ग्रामस्थांना पर्याय नसल्याने हे दुषित पाणीच प्यावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. नळगंगा योजनेद्वारे गावातील विहिरीतून ग्रामस्थांना पाणी पुरवठा केला जातो; परंतु या योजनेची जलवाहिनी काही ठिकाणी अनेक दिवसांपासून फुटली आहे. ती दुरुस्त करण्याची तसदी ग्रामपंचायकडून घेण्यात येत नाही. त्यामुळे ग्रामस्थांना ऐन हिवाळ्यातच तीव्र पाणीटंचाईच सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे वार्ड क्रमांक १ मधील ग्रामस्थ तलावावरील विहिरीचे दुषित पाणी पित असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात असतानाही ग्रामपंचायतकडून अद्याप पाणी पुरवठा सुरू करण्याचे प्रयत्न करण्यात येत नसल्याचे दिसत आहे. ग्रामपंचायतच्या दुर्लक्षीत कारभारामुळेच ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, दुषित पाण्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका असल्याचे मत गावातील संतोष बोडखे यांनी व्यक्त केले.