मानोरा तालुक्यातील २८ गावांचा पाणीपुरवठा महिनाभरापासून ठप्प!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 06:27 PM2018-07-29T18:27:35+5:302018-07-29T18:27:51+5:30
मानोरा : तालुक्यातील २८ गावांना पाणीपुरवठा करणारी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना गेल्या महिनाभरापासून बंद अवस्थेत असल्याने संबंधित गावांमधील नागरिकांची भर पावसाळ्यात पाण्यासाठी पायपीट सुरू असल्याचे दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : तालुक्यातील २८ गावांना पाणीपुरवठा करणारी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना गेल्या महिनाभरापासून बंद अवस्थेत असल्याने संबंधित गावांमधील नागरिकांची भर पावसाळ्यात पाण्यासाठी पायपीट सुरू असल्याचे दिसून येत आहे.
प्राप्त माहितीनुसार, दिग्रस तालुक्यातील चिरकुटा येथील अरूणावती प्रकल्पावरून सन १९९४-९५ मध्ये मानोरा तालुक्यातील मानोरा शहरासह २८ गावांकरिता प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची निर्मिती झाली. प्रत्यक्षात मात्र सुरूवातीपासूनच या ना त्या कारणांनी वांध्यात सापडलेल्या या योजनेच्या माध्यमातून २८ नव्हे; तर १४ ते १५ गावांनाच पाणीपुरवठा करण्यात आला. चालूवर्षीच्या उन्हाळ्यात पाण्याअभावी ही योजना पूर्णत: बंद पडली होती. मात्र, पाऊस झाल्यानंतर जून महिन्यापासून योजना पुर्ववत सुरू होईल, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत असताना गेल्या महिनाभरापासून नादुरूस्तीच्या नावाखाली नागरिकांना पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. यामुळे संबंधित गावांमधील नागरिकांना विहिर, हातपंप, कुपनलिकांचे तुलनेने दुषित पाणी प्यावे लागत आहे.
दुषित पाणी प्राशनाने ‘डायरिया’ची लागण!
विहिर, हातपंप, कुपनलिकांच्या पाण्याचे नमुने घेवून जलशुद्धीकरणाकडे प्रशासनाने विशेष लक्ष पुरविणे गरजेचे आहे. मात्र, याकडे संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याने दुषित पाणी प्राशनामुळे अनेक नागरिकांना ‘डायरिया’ची लागण होत असून असे रुग्ण दैनंदिन मानोरा येथील ग्रामीण रुग्णालयासह तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांमध्ये उपचार घेत आहेत. ही बाब लक्षात घेता तालुका प्रशासनाने तालुक्यातील सर्व ठिकाणच्या जलस्त्रोतांचे नमुने तपासून नागरिकांना शुद्ध पाणी पुरवावे, अशी मागणी सर्वच स्तरातून जोर धरत आहे.
मानोरा-२८ गावे पाणीपुरवठा योजनेत तांत्रिक अडचणी उद्भवल्यामुळेच पाणीपुरवठा करणे बंद आहे. पाईपलाईन दुरूस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर तत्काळ संबंधित सर्व गावांना पाणीपुरवठा केला जाईल.
- गजानन खराटे
शाखा अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मानोरा