पाणीपुरवठा, पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडीत केला जाणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 11:44 AM2021-03-20T11:44:58+5:302021-03-20T11:46:26+5:30

Washim News वीज पुरवठा तोडण्याची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता आर. जी. तायडे यांनी दिली.    

Water supply, power supply of street lights will be cut off! | पाणीपुरवठा, पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडीत केला जाणार!

पाणीपुरवठा, पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडीत केला जाणार!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडे विद्युत देयकांच्या थकबाकीचा एकूण आकडा ७२ कोटींपेक्षा अधिक झालेला आहे. यामुळे पाणीपुरवठा व पथदिव्यांचा वीज पुरवठा तोडण्याची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता आर. जी. तायडे यांनी दिली.    
महावितरणकडून गेल्या काही दिवसांपासून थकबाकीदार वीज ग्राहकांवर धडक कारवाई करण्यात येत आहे. त्यात आता ग्रामपंचायतीही ‘रडार’वर आल्या आहेत. महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी १५ मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पत्र पाठवून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडे पाणीपुरवठा व पथदिव्यांच्या विद्युत देयक थकबाकीसंबंधी अवगत केले आहे. वाशिम तालुक्यातील ग्रामपंचायतींकडे पाणीपुरवठ्याचा विद्युत देयकापोटी १.६८ कोटी; तर विद्युत पथदिव्यांच्या विद्युत देयक थकबाकीपोटी ९.८५ कोटी असे एकूण ११.५३ कोटी रुपये थकीत आहेत. याशिवाय कारंजा तालुक्यातील ग्रामपंचायतींकडे १२.५४, मालेगाव ११.८२, मंगरूळपीर १०.२१, मानोरा १३.९६ आणि रिसोड तालुक्यातील ग्रामपंचायतींकडे १२.२९ कोटी रुपयांची थकबाकी झालेली आहे. संबंधित ग्रामपंचायतींना वारंवार आवाहन करूनही काहीच फायदा झाला नाही. त्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू केली जाणार असल्याचे कार्यकारी अभियंता तायडे यांनी सांगितले.


जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना वारंवार आवाहन करूनही विद्युत देयकांची थकबाकी अदा करण्यात आलेली नाही. त्यामुळे अखेर नाइलाजास्तव पाणीपुरवठा आणि विद्युत पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित करावा लागत आहे. १४ व्या वित्त आयोगातून इतर सर्व कामे सुरळीतपणे केली जात आहेत. मात्र, विद्युत देयक भरण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची बाब गंभीर आहे.
- आर.जी. तायडे
कार्यकारी अभियंता, महावितरण, वाशिम

Web Title: Water supply, power supply of street lights will be cut off!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.