पावसाळ्यातही १७५१ टँकरद्वारे पाणीपुरवठा!
By Admin | Published: August 15, 2015 12:31 AM2015-08-15T00:31:17+5:302015-08-15T00:31:17+5:30
वाशिम जिल्ह्यात सात टँकर, अमरावती विभागात ३७ टँकर.
संतोष वानखडे /वाशिम : पावसाळ्याला सुरूवात होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. तथापि, राज्यातील काही गावे व वाड्यांमध्ये अद्यापही पाणीटंचाईची धग कायम आहे. राज्यातील १७५१ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू असून, यामध्ये अमरावती विभागातील २१ गावांमधील ३७ टँकरचा समावेश असल्याची नोंद राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या दप्तरी आहे. विविध कारणांमुळे ऋतूमानात बदल होत असल्याचा अनुभव सजीवसृष्टी घेत आहे. पावसाचे कमी प्रमाण आणि त्यातच जलपुनर्भरण व अन्य जलसंधारणच्या कामांबाबत जनजागृतीचा अभाव यामुळे जलपातळीत घट होत चालली आहे. यामुळे राज्यातील कित्येक गावांमध्ये हिवाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात पाणीटंचाईचे सावट असते. उन्हाळ्यात बहुतांश गावे पाणीटंचाईच्या चटक्याने होरपळून जातात, हे साहजिक आहे; मात्र भरपावसाळ्यातही राज्यातील अनेक गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते, ही विदारक स्थिती आहे. राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छ विभागाच्या १0 ऑगस्ट २0१५ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, राज्यात तब्बल १७५१ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. यामध्ये २0४ शासकीय व १५४७ खासगी टँकरचा समावेश आहे. गतवर्षी हाच आकडा १५५६ असा होता. यावर्षी जून महिन्यात सुरूवातीला दमदार पाऊस झाला; मात्र जुलै महिन्यात पाऊस फितूर झाल्याने राज्यात १७५१ ठिकाणी पाणीटंचाईची तीव्रता निर्माण झाली. टंचाईग्रस्त भागातील नागरिकांच्या कोरड्या घशाला पाण्याचा ओलावा देण्यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. पाणीटंचाईची धग सर्वाधिक मराठवाड्यात आहे. येथे तब्बल ११८८ टँकर सुरू आहेत. नागपूर व कोकण विभागात पाणीटंचाई नसल्याची नोंद पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या दप्तरी आहे. अमरावती विभागात अकोला, यवतमाळ व अमरावती जिल्ह्यात पाणीटंचाई नसल्याने एकही ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू नाही. वाशिम जिल्ह्यात दोन गावांत सात टँकर आणि बुलडाणा जिल्ह्यात १९ गावात ३0 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुणे २0, सातारा २७, सांगली २८, सोलापूर ८ असे एकूण ८३ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. नाशिक विभागात ४४३ टँकर सुरू आहेत.