वन्यजिवांसाठी पाण्याची सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 01:19 PM2020-03-05T13:19:53+5:302020-03-05T13:20:00+5:30
लोकवर्गणीतून नव्या कृत्रिम पाणवठ्यांचा कामाची सुरुवातही केली आहे.
लोकमत न्युज नेटवर्क
वनोजा / कोलार (वाशिम) : रखरखत्या उन्हात घोटभर पाण्यासाठी भटकणाºया वन्य प्राणी, पक्षांची तहान भागविण्यासाठी वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन टीमचे सदस्य सरसावले आहेत. वनोजा आणि कोलार परिसरातील जंगलात गतवर्षी लोकसहभागातून तयार केलेले पाणवठे त्यांनी टँकर आणून भरले आहेत, तर यंदा गोळा केलेल्या लोकवर्गणीतून नव्या कृत्रिम पाणवठ्यांचा कामाची सुरुवातही केली आहे.
वाशिम जिल्ह्यातील प्रादेशिक जंगलात नैसर्गिक जलसाठ्यांचे प्रमाण अगदीच नगण्य आहे. त्यातही हिवाळ्यातच हे जलसाठे कोरडे पडतात. त्यामुळे वन्यजीव तहान भागविण्यासाठी लोकवस्ती, शेतशिवारात धाव घेतात. त्यात रस्ता अपघात किंवा मानव-वन्यप्राणी संघर्ष घडून अनेक प्राण्यांना जीवही गमवावा लागतो. परिणामी जैवविविधता संकटात सापडते. मानदवन्य जीवरक्षक गौरवकुमार इंगळे यांनी ही बाब लक्षात घेत वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन टीमची स्थापना केली. ही संघटना वन्यजिवांचे सरंक्षण, संवर्धनासाठी काम करते. पाण्यासाठी वणवण भटकणाºया वन्यप्राण्यांचा जीव वाचविण्यासाठी गतदोन वर्षांपासून त्यांनी जंगलात कृत्रिम पाणवठे तयार करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. आता उन्हाळा लागल्यानंतर त्यांनी गतवर्षी वनोजा आणि कोलार परिसरातील जंगलात बांधलेले पाणवठे टँकरने भरण्यास सुरुवात केली आहे, तर यंदा नवे पाणवठे तयार करण्यासाठी गोळा झालेल्या लोकवर्गणीतून कृत्रिम पाणवठ्यांची कामे सुरू केली आहे. त्यामुळे हजारो वन्यजिवांची तहान भागणार आहे.