गतवर्षीच्या टँकरग्रस्त गावांत यंदाही पाणीटंचाई!

By admin | Published: May 30, 2017 01:31 AM2017-05-30T01:31:04+5:302017-05-30T01:31:04+5:30

प्रशासनाकडून टँकर सुरू करण्यास ‘खो’ : नागरिकांची पाण्यासाठी कोसोदुर पायपीट

Water tanker in the tanker-affected villages this year! | गतवर्षीच्या टँकरग्रस्त गावांत यंदाही पाणीटंचाई!

गतवर्षीच्या टँकरग्रस्त गावांत यंदाही पाणीटंचाई!

Next

धनंजय कपाले / बबन देशमुख
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम-मानोरा : गतवर्षीच्या टँकरग्रस्त गावांत यावर्षीही पाणीटंचाई उद्भवलेली असतानाही, टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला नाही. परिणामी, नागरिकांना पाण्यासाठी पायपिट करावी लागत आहे.
गतवर्षी वाशिम तालुक्यातील माळेगाव, अंजनखेड, भोयता, काकडदाती, बाभूळगाव, फाळेगाव, दगडउमरा, वांगी, पिंपळगाव (डा.बं.), कोंडाळा महाली, बोरी बु., धानोरा बु., पार्डी आसरा, सुरकुंडी, दोडकी, वाळकी जहॉगीर, कार्ली, शेलु बु., हिवरा रोहिला आदी गावांत टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. या टँकरवर ५१ कोटी ६३ लाख रुपये खर्च झाले होते.
यापैकी माळेगाव व अंजनखेडा या दोन गावांत टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. उर्वरीत गावांना टँकरची प्रतीक्षा आहे. कोंडाळा महाली येथे भीषण पाणीटंचाई असतानाही टँकर सुरू नाही. काही दिवसांपूर्वी नागरिकांनी ग्रामपंचायतवर मोर्चा नेला होता. यंदा पाण्याची टंचाई एप्रिल पासूनच निर्माण झाली. पाणी टंचाईमुळे गावातील महिलांना अर्धा ते एक किलोमिटर पर्यंत पायदळ जाऊन डोक्यावर पाणी आणावे लागते. काही शेतकरी आपल्या शेतामधून बैलगाडी मध्ये पाणी घेऊन येतात. या गावामध्ये दरवर्षीच पाणीटंचाईचा सामना गावकऱ्यांना करावा लागतो. गतवर्षी उन्हाळ्यामध्ये कार्ली गावात पाणी टंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे शासनाने टँकरची व्यवस्था केली. मागील वर्षी पावसाळा चांगला झाल्यामुळे गावातील विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली. याशिवाय गावातील विहिरीमधील गाळ उपसा करण्यात आला. त्याचा परिणाम म्हणून यंदा गावामध्ये मुबलक पाणी उपलब्ध आहे. याशिवाय गावामध्ये खासगी पाईप लाईनद्वारे पाणी पुरवठा होत असल्यामुळे ग्रामस्थांना कोणतीच अडचण भासत नाही.
मानोरा : गतवर्षी टँकरग्रस्त असलेल्या काही गावांनी विहिर अधिग्रहणाचे प्रस्ताव शासनाकडे पाठविले. मात्र, अद्याप विहिर अधिग्रहण झाले नाही. गतवर्षी उज्वलनगर, पाळोदी, हिवरा खु., सावरगाव फॉरेस्ट, रणजित नगर, दापुरा बु. व दापुरा खुर्द, इंझोरी, ढोणी, कुपटा, चोंढी, जनुना खु. आदी गावांत टँकरने पाणीपुरवठा केला होता. यावर ३७ कोटी ५६ लाख रुपये खर्च झाले होते.
त्यापैकी यावर्षी केवळ उज्वलनगर व रणजितनगर येथेच टँकरने पाणी पुरवठा केला आहे. उर्वरीत गावांत पाणीटंचाई असतानादेखील टँकर सुरू केले नाही. तालुक्यातील उज्वलनगर, रणजीतनगर, ढोणी गावांना भिषण पाणी टंचाईने ग्रासले आहे. तर अकरा ग्रामपंचायतींनी विहीर अधिग्रहणसाठी प्रस्ताव पाठविले.
ढोणी येथे अद्याप टँकर सुरू झाले नाही. पाणी टंचाईचे तीव्र चटके जाणवू लागण्याआधीच उज्वलनगर, रणजीतनगर, हळदा, ढोणी, गलमगाव, वापटा, शेंदुरजना अढाव, सावरगाव फॉरेस्ट, हातना, मेंद्रा, इंगलवाडी आणि आमगव्हाण येथे विहीर अधिग्रहणासाठी ग्राम पंचायतच्यावतीने ठराव पाठविण्यात आले; परंतु अद्याप पावेतो विहीर अधिग्रहीत करण्यात आल्या नाही. याकडे स्थानिक पंचायत समितीसह जिल्हा प्रशासनाने लक्ष देणे अपेक्षीत आहे.

Web Title: Water tanker in the tanker-affected villages this year!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.