पाणी पुरवठ्यास असमर्थ पालिकेने पाणीपट्टी रद्द करावी - नगरसेवकाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 03:26 PM2018-05-03T15:26:24+5:302018-05-03T15:26:24+5:30
मंगरुळपीर: शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, अद्यापही पालिकेच्यावतीने पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही. ही स्थिती लक्षात घेऊन पालिकेने यंदाची पाणीपट्टी वसुली रद्द करावी, अशी मागणी भाजपचे नगरसेवक अनिल गावंडे यांनी केली आहे.
मंगरुळपीर: शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, अद्यापही पालिकेच्यावतीने पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही. ही स्थिती लक्षात घेऊन पालिकेने यंदाची पाणीपट्टी वसुली रद्द करावी, अशी मागणी भाजपचे नगरसेवक अनिल गावंडे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी मंगरुळपीरच्या नगराध्यक्षांना गुरुवारी पत्रही सादर केले आहे.
सध्या मंगरुळपीर शहरात पाणीटंचाईने भीषण रुप धारण केले आहे. मोतसावंगा धरण आटल्यामुळे शहरातीन नळयोजनेचा पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. शहरातील नळधारक व इतर नागरिक खाजगी टँकरचा आधार घेत आहेत. तथापि, आर्थिक परिस्थिती हालाखीची असलेले नागरिक आणि गुरांचे पाण्याअभावी अतोनात हाल होत आहेत. तब्बल २० ते २५ दिवसांनी नळाद्वारे सोडण्यात येत असलेले पाणी अत्यंत घाण आणि दुर्गंधीयुक्त असल्याने पिण्यासाठीच काय, तर इतर वापरासाठीही हे पाणी घातक ठरत आहे. त्यामुळे आजाराची साथ पसरण्याची भिती आहे. अर्थात नागरिकांना शुद्ध आणि पुरेशा प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यास पालिका असमर्थ ठरली असून, पाणीपट्टी कर, नळाचा कर मागण्याचा अधिकारही गमावून बसली असून, ही स्थिती लक्षात घेता नागरिकांकडून पाणीपट्टी वसुल करणे गैरकायदेशीर ठरेल, त्यामुळे पालिकेने नागरिकांकडून पाणीपट्टी वसुल करू नये, असे अनिल गावंडे यांनी निवेदनात नमूद केले आहे.