वारा प्रकल्पाचे पाणी पूस नदीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 01:19 PM2018-12-23T13:19:46+5:302018-12-23T13:19:50+5:30
देपूळ (वाशिम): सिंचनात वाढ करण्यासाठी उभारलेल्या वारा जहॉगिर प्रकल्पातील पाणी अवास्तव पूस नदीत सोडले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
देपूळ (वाशिम): सिंचनात वाढ करण्यासाठी उभारलेल्या वारा जहॉगिर प्रकल्पातील पाणी अवास्तव पूस नदीत सोडले जात आहे. यामुळे चार गावांतील रब्बी पिके संकटात सापडली असून, प्रकल्पाच्या सिंचन प्रकल्पाच्या कालव्याचे काम पूर्ण होईपर्यंत या प्रकल्पाचे पाणी पूस नदीत सोडू नये, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.
सिंचन क्षेत्रात वाढ करण्याच्या उद्देशाने वारा जहॉगिर प्रकल्पाची घळभरणी झाल्यानंतर हा प्रकल्प गतवर्षीप्रमाणेच यंदाही काठोकाठ भरला आहे; परंतु या प्रकल्पाच्या कालव्याचे काम अपूर्ण असताना प्रकल्पाचे पाणी पूस नदीत सोडण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकल्पातील जलसाठा कमी होऊन तो ६० टक्क्यांवर आला आहे. यामुळे याच प्रकल्पावर उपसा सिंचन पद्धतीने गहू, हरभरा या रब्बी पिकांसह भाजीपाला पिके घेणाºया शेतकºयांची पंचाईत झाली आहे. पाण्याअभावी पिके संकटात सापडल्याने शेतकºयांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रकल्पातील मोठ्या प्रमाणात पाणी पूस नदीत सोडण्यात येत असल्याने येत्या काही दिवसांत हा प्रकल्प कोरडा होण्याची भितीही आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे पाणी पूस नदीत सोडण्याऐवजी कालव्याचे काम पूर्ण करून कालव्याद्वारेच पाणी सोडावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे.
चार गावच्या शेतकºयांसह शिवसंग्रामचे निवेदन
वारा प्रकल्पातील पाणी अवास्तव पूस नदीत सोडण्यात येत असल्याने या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या शेतकºयांची रब्बी पिके संकटात सापडली असून, हा प्रकार थांबविण्यासाठी शिवसंग्रामचे वाशिम-मंगरुळपीर विधानसभा अध्यक्ष महादेव उगले यांच्या नेतृत्वात चार गावच्या शेतकºयांनी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर केले आहे. प्रकल्पातील पाणी पूस नदीत सोडणे त्वरीत बंद न केल्यास शिवसंग्राम आणि शेतकºयांना आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल, असा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे.
वारा जहॉगिर प्रकल्पात सद्यस्थितीत ६७ टक्के जलसाठा आहे. प्रकल्पाच्या खालच्या भागातील शेतकºयांना पाणीकर घेऊन चार वेळा पाणी देण्यात येणार आहे. तो त्यांचा अधिकार आहे. त्यापैकी तीन वेळा पाणी सोडण्यात आले असून, आणखी एक वेळा पाणी सोडण्यात येणार आहे. ही पाळी झाल्यानंतर त्यांना पाणी सोडले जाणार नाही.
-शिवाजीराव जाधव, कार्यकारी अभियंता, लघू पाटबंधारे विभाग, वाशिम.