जलवाहिनी दुरुस्तीनंतरही पाण्याचा अपव्यय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 02:59 PM2019-01-18T14:59:04+5:302019-01-18T14:59:09+5:30
शिरपूर जैन : अडोळ प्रकल्पातून रिसोड शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन अनेक ठिकाणी लिकेज असल्याने लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन : अडोळ प्रकल्पातून रिसोड शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन अनेक ठिकाणी लिकेज असल्याने लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. यासंदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित करुन संबधितांचे लक्ष वेधल्याने जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात आली. परंतु करण्यात आलेल्या थातूर-मातूर कामामुळे आजही लाखो लिटर पाण्याचा अपव्यय बेलखेडनजिक वॉलच्या गळतीवरुन दिसून येते.
बेलखेडजवळील वॉलमधून मोठया प्रमाणात फवारे उडून पाण्याचा पाट वाहतांना दिसून येत आहे. याकडे मात्र संबधितांचे साफ दुर्लक्ष दिसून येत आहे. गत दहा दिवसांपाूवी पार्डी तिखे येथे लिकेज झाल्याने अनेक महिन्यांपासून पाण्याचा अपव्यय होत असतांना याकडे कुणाचेही लक्ष नव्हते. यासंदर्भात लोकमतने ५ जानेवारी रोजीच्या अंकात वृत्त प्रकाशित करताच या कामास सुरुवात करण्यात आली. हे काम करतांना परिसरात अधिक कुठे लिकेज आहे का, वॉल नादुरुस्त आहेत का याची पाहणी करण्यात न आल्याने आजही लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होतांना दिसून येत आहे. एकीकडे पाणी टंचाई व दुसरीकडे होत असलेल्या या पाण्याच्या अपव्ययाबद्दल नागरिकांमध्ये रोष व्यक्त केल्या जात आहे.
मालेगाव तालुक्यातील शिरपूरपासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या आडोळ प्रकल्पातून रिसोड शहराला पाणीपुरवठा होतो. त्यासाठी रिसोड नगरपरिषदेची स्वतंत्र पाईपलाईन आहे. ही पाईपलाईन अनेकदा लिकेज होत आहे परंतु वरिष्ठांचे याकडे दुर्लक्ष दिसून येत आहे.
अडोळ प्रकल्पातून रिसोड शहराला पाणीपुरवठा करणारी रिसोड नगरपरिषदची पाईप लाईन अनेकदा लिकीज झाल्याने लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत होता. यासंदर्भात लोेकमतने वेळोवेळी पाठपुरावा करुन संबधितांचे लक्ष वेधून त्याची दुरुस्ती करण्यात आली. परंतु योग्य देखरेख व नियोजनाअभावी वारंवार जलवाहिनी, वॉल लिकेज होवून पाण्याचा अपव्यय होतांना दिसून येत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देवून कायमस्वरुपी उपाय योजना करण्याची मागणी होत आहे.