काजळेश्वरात बहरली टरबुज शेती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 09:21 AM2021-02-05T09:21:20+5:302021-02-05T09:21:20+5:30
शेतीत पिकविल्या जाणारा माल बाजारात विकला गेला, त्याला मागणी असली, तरच शेतकऱ्यांचा आर्थिक विकास शक्य आहे. ही बाब लक्षात ...
शेतीत पिकविल्या जाणारा माल बाजारात विकला गेला, त्याला मागणी असली, तरच शेतकऱ्यांचा आर्थिक विकास शक्य आहे. ही बाब लक्षात घेऊन कृषी विभागाने विकेल ते पिकेल, या धोरणाचा अवलंब करीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन सुरू केले आहे. त्याचे चांगले परिणाम आता दिसत आहेत. काजळेश्वर परिसरातील शेतकरी आता पारंपरिक पिकांचा अट्टाहास न करता, इतर पिकांचा आधार घेऊ लागले आहेत. त्यात गत पावसाळ्यात दमदार पाऊस पडल्याने जलपातळी चांगलीच वाढली आहे. त्यामुळे सिंचनासाठी आधार असल्याने शेतकरी हंगामी फळपिकांचा आधार घेऊ लागले आहेत. त्यात टरबूज शेतीवर शेतकऱ्यांचा अधिक भर असून, या पिकाची लागवड परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. हे पीक आता फळधारणेच्या अवस्थेत असल्याने शेतकऱ्यांत उत्साहाचे वातावरण आहे. त्यात काजळेश्वर येथील प्रगत शेतकरी दिगांबर उपाध्ये यांनी दोन एकर क्षेत्रावर टरबुजाची बारा हजार रोपे लावली. आज ती टरबूज शेती बहरली असून, प्रत्येक वेलीला किमान दोन तीन फळे लागली आहेत. तीन महिन्यांचे हे पीक असून, मार्चमध्ये काढणीवर येणार आहे. उन्हाळ्यात टरबुजाला मागणी जास्त राहत असल्याने चांगला नफा मिळेल, असा आशावाद येथील शेतकरी दिगंबर उपाध्ये यांनी व्यक्त केला.