वाशिम जिल्ह्यात पाझर तलाव फुटले, विहिरी खचल्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 01:58 PM2018-08-21T13:58:56+5:302018-08-21T14:00:22+5:30
वाशिम : जिल्ह्यातील सहाही तालुक्यांमध्ये गेल्या सहा दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. दरम्यान, या पावसामुळे मानोरा तालुक्यातील वापटा येथील मुंडाळा पाझर तलाव फुटला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यातील सहाही तालुक्यांमध्ये गेल्या सहा दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. दरम्यान, या पावसामुळे मानोरा तालुक्यातील वापटा येथील मुंडाळा पाझर तलाव फुटला. तसेच मोठमोठ्या विहिरीही खचल्या. यामुळे शेतजमिनी खरडून जाण्यासोबतच खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले.
पाझर तलाव फुटल्यामुळे आलेल्या पुरात ५० जनावरे वाहून गेली. त्याचबरोबर हजारो हेक्टर शेतजमिनीतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गत सहा दिवसांपासून जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. १६ आॅगस्ट रोजी कारंजा व मानोरा तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले. मानोरा तालुक्यात शुक्रवार, १७ आॅगस्टपासून सर्वेक्षणाला सुरूवातही झाली होती. शनिवार, रविवारी पावसाने थोडी उसंत घेतल्यानंतर सोमवारपासून पुन्हा पावसाचा जोर वाढला. मंगळवारी सकाळपासूनच पाऊस ठाण मांडून असल्याने सर्वेक्षणाचे कामही ठप्प पडले आहे. २० व २१ आॅगस्टच्या पावसामुळे शेतात पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले. शेतीची कामे सहाव्या दिवशीही ठप्प असल्याचे दिसून येते. महसूल विभागाने नुकसानग्रस्त भागांचे तत्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्यासवी, अशी मागणी बाधीत शेतकºयांमधून जोर धरत आहे.