रानभाज्या नामशेष होण्याच्या मार्गावर
By admin | Published: August 7, 2015 01:16 AM2015-08-07T01:16:11+5:302015-08-07T01:16:11+5:30
तणनाशकाच्या वाढता वापर.
कारंजा लाड (जि. वाशिम): गतकाही वर्षांपासून शेतीपद्धतीत झालेला विघातक बदल आणि तणनाशकाच्या वाढत्या वापरामुळे गावरान वाण नष्ट झालेच शिवाय पावसाळ्याच्या दिवसांत शेताच्या बांधावर उगवणाऱ्या रानभाज्याही नामशेष झाल्याचे दिसत आहे. त्याशिवाय जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे.
विविध नैसर्गिक संकटे, शासनाचे धोरण, वाढत्या महागाईच्या तुलनेत शेतमालाला मिळणारे अत्यल्प भाव, तसेच मजुरांची वाणवा आदि कारणांमुळे भारतीय शेतीपद्धती पूर्णपणे बदलली आहे. शेतीपद्धतीत झालेल्या बदलाचे दुष्परिणाम आता मोठ्या प्रमाणात दिसत आहे. पावसाळ्यात सर्वत्र शेताच्या बांधावर व शेतामध्ये अनेक रानभाज्या निसर्गत: उगवतात. पूर्वीच्या काळी या भाज्या मोठ्या प्रमाणात पहावयास मिळत; परंतु गत काही वर्षांमध्ये तणनाशकाच्या वापरात वाढ झाल्याने या रानभाज्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. रानभाज्या म्हणजे गरीब शेतमजूर, शेतकऱ्यांचा रानमेवा; परंतु हा रानमेवा आता तणनाशकाच्या अति वापरामुळे नामशेष होत असून पावसाळ्यांत या जेवणाची लज्जत वाढविणाऱ्या या भाज्याच नाहीशा होत आहेत. पूर्वी पावसाच्या आगमनाने शेतीला मातीच्या सुंगधाने मन प्रसन्न व्हायचेच. त्याचबरोबर शेताच्या बांधांवर चवळी, तरोटा, अंबाडी, चाकवत, चिवडी, लालमाठ, कटुले, अशा अनेक रानभाज्या आपोआप उगवायच्या. त्यामुळे आतासारखी महागाई तेवढी जानवत नव्हती. शेतकरी. शेतमजुरांचा अर्धा हिवाळा या भाज्यांवर निभायचा. शेतमजुर महिला घरी परत येत असताना या भाज्या तोडून आणायच्या, त्यामुळे दोन वेळेच्य भाजीची सोय व्हायची. जुन्याजाणत्या अनेकांना आजही या भाज्या आठवतात. अजच्या घडीला यातील काही भाज्या आगाऊ पैसे देवून विकत घेतल्या जातात. दशकभरापूर्वी शेती करायच्या पध्दतीत भरपूर बदल झाले आहे. शेतीच्य गरजा वाढल्या आहे. पिकासोबत येणारे तण काढून टाकण्यासाठी निंदणाची गरज असते आणि त्यासाठी मजुरांची अत्यंत निकड असते. आजच्या घडीला मजुर मिळेनासे झाले आहेत. त्यामुळे वैज्ञानिकांनी तणनाशकाचा शोध लावला. मजुरी वाढल्याने शेतकरी ना इलाजाने अशा औषधाचा वारंवार वापर करीत आहेत. त्यामुळे शेतात बांधावर उगवणाऱ्या चवळीची भाजी करडु, कोसळी, अंबाडी, तरोटा, वाघाटे, आणि रानभाज्या नामशेष होताहेत. कृषी क्षेत्रात होत असलेल्या नवनवीन संशोधनामुळे अनेक जुने गावराण वाणही नष्ट होत आहे. शेतात उगवणाऱ्या व रस्त्यावर उगवणाऱ्या तरोट्याची जागा आता गाजर गवताने घेतली आहे. तणनाशकाच्या वापराचे दुष्परिणाम समोर येत आहेत.