रक्तसाठा संपण्याच्या मार्गावर, रक्तदान करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:27 AM2021-06-29T04:27:49+5:302021-06-29T04:27:49+5:30
२०१९ पर्यंत दरवर्षी जिल्हाभरात आरोग्य विभागासह सामाजिक संघटनांकडून आयोजित केल्या जाणाऱ्या रक्तदान शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळायचा. त्यामुळे रक्ताचा तुटवडा ...
२०१९ पर्यंत दरवर्षी जिल्हाभरात आरोग्य विभागासह सामाजिक संघटनांकडून आयोजित केल्या जाणाऱ्या रक्तदान शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळायचा. त्यामुळे रक्ताचा तुटवडा कधी जाणवला नाही; मात्र २०२० च्या मार्च, एप्रिल महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचे संकट उद्भवण्यासोबतच रक्तदानाचे प्रमाणही झपाट्याने घटले. परिणामी, सिकलसेल, थॅलेसेमिया यासारखे गंभीर व दुर्मिळ आजार जडलेल्या रुग्णांचा जीव रक्त मिळण्याअभावी धोक्यात सापडला आहे. याशिवाय प्रसूतीदरम्यान अधिक रक्तस्त्राव झाल्यास, अपघातांमध्ये गंभीर जखमी झाल्यास संबंधितांची रक्ताची गरज पूर्ण करण्यात अडचण निर्माण झाली आहे. ही बाब लक्षात घेता रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन रक्तदानाच्या चळवळीत सक्रिय राहून सर्वतोपरी योगदान देणाऱ्या सामाजिक संघटनांकडून करण्यात आले आहे.
.....................
कोट :
कारंजा येथे काही युवकांनी पुढाकार घेऊन कारंजा रक्तदान चळवळ या नावाने ग्रुप तयार केला आहे. या माध्यमातून आम्ही वर्षभरात १२ रक्तदान शिबिर घेतो; मात्र गेल्या काही दिवसांपासून समाजातील रक्तदात्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळेनासा झाला आहे. ही चळवळ अधिक वृद्धिंगत होण्यासाठी शहरांसोबतच ग्रामीण भागातून रक्तदानास प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे.
- प्रज्वल गुलालकरी
कारंजा रक्तदान चळवळ
......................
समाजात रक्तदानासंबंधी प्रभावी जनजागृती करण्यासह रक्तदान घडवून आणण्यासाठी वाशिम शहरात मोरया ब्लड डोनर ग्रुप सक्रिय आहे. गंभीर आजारातील रुग्ण, गर्भवती महिला आणि अपघातग्रस्तांना वेळेवर रक्त मिळावे, याकरिता प्रयत्न केले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून रक्तदानाचे प्रमाण कमी झाले. यामुळेच रक्ताचा तुटवडा निर्माण होत आहे. रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येणे आवश्यक आहे.
- महेश धोंगडे
मोरया ब्लड डोनर ग्रुप, वाशिम
.................
कोरोनाच्या संकटकाळात अचानक रक्ताचा तुटवडा जाणवायला लागला. रक्तदात्यांपैकी अनेकजण कोरोनाने बाधित झाले. त्यानंतर काही लोकांनी कोरोनाची लस घेतली. यामुळे त्यांना रक्तदान करणे जमले नाही; मात्र आता परिस्थिती बऱ्यापैकी पूर्वपदावर आलेली आहे. त्यामुळे आपल्यापैकी कोणाचा धोक्यात सापडलेला जीव वाचविण्याकरिता रक्तदात्यांनी पुढे येऊन रक्तदान चळवळीत सहभागी व्हायला हवे.
- दीपकअन्ना मादसवार
वीर भगतसिंग ब्लड डोनर ग्रुप, वाशिम