महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ देऊ - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
By संतोष वानखडे | Published: March 4, 2024 06:12 PM2024-03-04T18:12:18+5:302024-03-04T18:13:26+5:30
घरात बसून आदेश देणारा मी मुख्यमंत्री नाही असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
वाशिम : बचत गटाच्या महिलांनी विविध प्रकारच्या वस्तू, माल उत्पादित करावा. महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू, मालाचे ब्रॅडिंग, मार्केटिंग, विक्रीसाठीदेखील जिल्हाधिकारी, नगर पालिका यांनी स्टाॅल उभे करून द्यायचे आणि त्या ठिकाणी विक्रीला संधी उपलब्ध करून द्यायची, असा निर्णय घेत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाशिम येथील महिला मेळाव्यात सोमवारी (दि.४ मार्च) जाहिर केले.
व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेवराव जानकर, आमदार ॲड. किरणराव सरनाईक, माजी आमदार गोपीकिशन बाजोरीया, आमदार विप्लव बाजोरीया, जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, शांतीपुरी महाराज, गोपालबाबा महाराज, गजाननबाबा महाराज, शिवसेना जिल्हा प्रमुख विजय खानझोडे व महादेवराव ठाकरे, राकाॅं (अजित पवार) जिल्हाध्यक्ष युसूफ पुंजाणी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी महिला, मुलींच्या कल्याणासाठी सुरू केलेल्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा निर्णयही घेतला जाणार आहे. महिलांनीदेखील पुढे येऊन अधिक जोमाने स्वयंरोजगाराचे काम करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
यावेळी ना. गुलाबराव पाटील यांनी महायुती सरकारने महिलांच्या फायद्यासाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. आम्हाला गद्दार, गद्दार म्हणून हिणवणाऱ्यांनी आमच्या नादी लागू नका, असा इशाराही दिला. खासदार भावना गवळी यांनी विकासकामाच्या बळावर यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ हा २५ वर्षे शिवसेनेच्या ताब्यात ठेवल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. दिलीप जोशी, प्रास्ताविक मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष नारायणराव काळबांडे यांनी केले. महिला मेळाव्याला हजारो महिला, पुरूषांची उपस्थिती होती. पोलिसांनीदेखील चोख बंदोबस्त ठेवला.
घरात बसून आदेश देणारा मुख्यमंत्री नाही...
घरात बसून आदेश देणारा मी मुख्यमंत्री नाही असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. तोंडाला पाने पुसणारा नाही, खोटी आश्वासने न देणारा, दिलेला शब्द पाळणारा असल्याने माझ्यासोबत ५० आमदार आल्याचा पुनरूच्चारही त्यांनी केला.
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघावर महायुतीचाच झेंडा...
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत ‘अब की बार, ४५ पार’ असा महायुतीचा नारा असून, यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघावरदेखील महायुतीचाच भगवा झेंडा फडकेल, असे भाकीतही त्यांनी वर्तविले. यावेळी यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ हा महायुतीत नेमका कोणाला सुटणार? यावर मुख्यमंत्र्यांनी कोणतेही भाष्य न केल्याने ‘सस्पेन्स’ अधिकच वाढला आहे.
तिकिट तुम्ही देता की मी देवू - जानकर
खासदार भावना गवळी यांना यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाचे तिकिट द्या, नाहीतर मी माझ्या पक्षाचे तिकिट त्यांना देईन असे महादेवराव जानकर यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाहून म्हटले आणि मेळाव्यात टाळ्यांचा कडकडाट झाला.
आमदार सरनाईक शिवसेनेत
महिला मेळाव्यात अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाचे अपक्ष आमदार ॲड. किरणराव सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहिर प्रवेश केला. यावेळी भगवा रूमाल गळ्यात टाकून मुख्यमंत्री शिंदे यांनी आमदार सरनाईक यांचे शिवसेनेत स्वागत केले.