पुलाच्या खचलेल्या कडांमुळे अपघाताची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2017 07:01 PM2017-07-25T19:01:48+5:302017-07-25T19:05:09+5:30
मंगरुळपीर तालुक्यातील काही पुलांची अवस्था अत्यंत वाईट आहे. नादुरुस्त पुलांमुळे अपघाताची भिती असल्याने हे पूल दुरुस्त करणे आवश्यक आहे.
वाशिम, दि. 25 - मंगरुळपीर तालुक्यातील काही पुलांची अवस्था अत्यंत वाईट आहे. नादुरुस्त पुलांमुळे अपघाताची भिती असल्याने हे पूल दुरुस्त करणे आवश्यक आहे. शहरालगत असलेल्या मानोरा मार्गावरील अरुणावती नदीच्या पुलाचे कठडे पूर्णपणे खचल्यामुळे येथून वाहनधारकांना काळजीपूर्वकच वाहन चालवावे लागत असल्याचे पाहायला मिळते. याची बांधकाम विभागाने दखल घेणे अत्यंत गरजेचे झाले आहे.
मंगरुळपीर शहराच्या बाहेरून अरू णावती ही नदी वाहते. शहरातून जाणाºया मानोरा मार्गावर या नदीवर वाहतुकीसाठी अनेक वर्षांपूर्वी एक पूल बांधण्यात आला आहे. सद्यस्थितीत या पुलाची अवस्था गंभीर आहे. पुलाच्या दोन्ही बाजूच्या कडा खचल्या असून, भिंतीही जीर्ण झाल्या आहेत. या पुलाची उंचीही खूप कमी आहे. एखाद वेळी नदीला पूर आल्यास पुलावरून फुट, दोन फूट पाणी वाहते. अशात पुल दिसतही नाही. त्यामुळे वाहनधारकांनी पुलावरून पाणी वाहत असताना वाहन नेण्याचा प्रयत्न केल्यास अपघात घडण्याची शक्यता मुळीच नाकारता येत नाही. त्यातच पुलाची रुंदी कमी असल्याने वाहनांची वर्दळ वाढून एकाच वेळी दोन तीन वाहने पुलावर आल्यास मार्ग काढण्याच्या प्रयत्नात एखादे वाहन पुलावरून खाली कोसळून मोठा अपघात होण्याचीही दाट शक्यता आहे. गेल्या पाच सहा वर्षांपासून हीच स्थिती असतानाही बांधकाम विभागाच्यावतीने या पुलाची उंची वाढविणेच काय, तर पुलास कठडे बसविण्याची तसदीही घेतली नाही.