संत्रा पिकातील मृग बहार व्यवस्थापन विषयावर वेबिनार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:29 AM2021-06-18T04:29:07+5:302021-06-18T04:29:07+5:30
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. रवींद्र काळे, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून वरिष्ठ शास्त्रज्ञ, केंद्रीय लिंबूवर्गीय फळ ...
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. रवींद्र काळे, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून वरिष्ठ शास्त्रज्ञ, केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था, नागपूरचे डॉ. अंबादास हुच्चे, सहा. प्राध्यापक, अखिल भारतीय लिंबू वर्गीय फळ संशोधन प्रकल्प, डॉ. पं. दे. कृ. वि. अकोला डॉ. योगेश इंगळे आणि कृषी विज्ञान केंद्राचे उद्यानविद्या तज्ञ निवृत्ती पाटील उपस्थित होते. तांत्रिक मार्गदर्शनात डॉ. अंबादास हुच्चे यांनी संत्रा बागेतील ताणाची अवस्था बघून करावयाच्या उपाययोजनाविषयी सविस्तर मार्गदर्शन करीत संत्र बागाईतदारांनी पावसाच्या पाण्याची दो ते तीन इंच ओल गेल्याशिवाय बागेचा ताण सोडू नये, तसेच ताणाच्या अवस्थेत पाऊस झाला असल्यास ताण कायम राखण्यासाठी सी.सी.सी. या वाढ रोधकाची फवारणी घ्यावी, असे आवाहन केले. डॉ. योगेश इंगळे यांनी मृग बहारात येणाऱ्या किडी व रोग आणि त्यांचे व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन करीत भारी जमिनीत प्रामुख्याने येणारा डिंक्या रोग, ग्रिनींग विषाणूजन्य रोग, कोळशी, आदी रोगांची कारणे, लक्षणे व उपाय याविषयी सविस्तर माहिती दिली. निवृत्ती पाटील संत्रा पिकाची नवीन बाग लागवड व छाटणी तंत्रज्ञान याविषयी माहिती देत शेतकरी बंधूंनी २.५ ते ३ फूट उंचीच्या व ६ ते ९ इंचांवर डोळा बधालेल्या कलमाची खात्रीशीर रोपांची निवड करावी, असे सांगितले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. रवींद्र काळे यांनी शेती पद्धतीमध्ये एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करून उत्पादन खर्च कमी करण्याचे आवाहन केले. श्रीकृष्ण बावस्कर यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.