लग्न समारंभात वऱ्हाडी फिरतात विना मास्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:49 AM2021-02-17T04:49:10+5:302021-02-17T04:49:10+5:30
कांरजा लाड : शेजारच्या जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे कांरजा तालुक्यातसुध्दा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ ...
कांरजा लाड : शेजारच्या जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे कांरजा तालुक्यातसुध्दा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यातच होणाऱ्या लग्न समारंभात वऱ्हाडी मंडळींची गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून येते, मात्र कोणीही मास्कचा वापर करताना दिसून येत नाही. त्यामुळे कारंजेकरांनी पुन्हा दक्ष राहावे, असे आवाहन डाॅ. किरण जाधव आरोग्य अधिकारी कारंजा यांनी केले आहे.
कोरोना काळात लग्न समारंभाकरिता वऱ्हाडी मंडळीची मर्यादा ही ५० एवढी होती. त्यामुळे लग्न सोहळा कमी वऱ्हाडी मंडळीच्या उपस्थित व्हायचा, मात्र आता शासनाने शिथिलता दिल्यामुुळे नागरिक बिनधास्तपणे मास्कचा वापर न करता फिरतात. इतर जिल्ह्यातून आलेली मंडळी थेट संपर्कात येऊन संख्या गेल्या तीन-चार दिवसांपासून वाढत असून आज रोजी कारंजातील कोरोना संख्या २३ आहे. दररोज या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. शहरातील मंगल कार्यालयात तसेच हॉटेलवरील ग्राहक व बसस्टँडवरील प्रवासी मास्क न वापरता प्रवास करतात. त्यामुळे कारंजा शहरातील नागरिकांच्या संपर्कात थेट रुग्ण येत असल्याने रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. प्रशासनाने यावर बंधन लावावे तरच रुग्णसंख्या कमी होण्यास मदत होईल.
जिल्ह्यालगत असलेल्या अकोला व अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे आपल्याकडेसुद्धा रुग्णसंख्या वाढत आहे. परिणामी नागरिकांनी नियमित मास्कचा वापर करावा व गर्दीचे ठिकाण टाळावे.
डॉ. किरण जाधव
आरोग्य अधिकारी, पं. स. कारंजा