१५ व्यक्तींच्या उपस्थितीतच उरकावे लागणार लग्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 11:25 AM2021-05-11T11:25:24+5:302021-05-11T11:25:30+5:30
Washim News : यापुढे १५ व्यक्तींच्या उपस्थितीतच लग्न समारंभ उरकावे लागणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक निर्बंध लागू केले असून, यापुढे १५ व्यक्तींच्या उपस्थितीतच लग्न समारंभ उरकावे लागणार आहेत..
जिल्ह्यात वाढीव कोरोना चाचण्यांच्या तुलनेत रुग्णांची संख्या कमी असली तरी रुग्णसंख्येत चढ-उतार येत असल्याने जिल्हा प्रशासनाने कठोर निर्बंध लागू केले आहेत. यापूर्वी लग्न समारंभाला २५ लोकांच्या उपस्थितीचे बंधन होते. आता यामध्ये १० ने संख्या कमी करून केवळ १५ व्यक्तींच्या उपस्थितीतच दोन तासांत लग्न समारंभ उरकावा लागणार आहे. शहरासह ग्रामीण भागात कुठेही बेकायदेशीररित्या लग्नसोहळा पार पडणार नाही, याची संबंधित ग्रामस्तरीय कोरोना नियंत्रण समितीने दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी दिले आहेत.
बेकायदेशीररीत्या लग्नसोहळा आयोजित केल्यास नियानुसार कारवाई करण्यात येईल. लग्नसमारंभाचे नियोजन व नियंत्रणाची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्था व संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. कोरोनामुळे लग्नसमारंभही अडचणीत सापडले असून, काहींनी लग्न समारंभ पुढे ढकलल्याची माहिती आहे.
लग्न समारंभात १५ पेक्षा अधिक लोकांची उपस्थिती राहू नये म्हणून मंगल कार्यालय, ग्रामीण भागात भेटी देण्याचे निर्देशही संंबंधित यंत्रणेला जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.