कोरोनामुळे मंगरुळपीर येथील आठवडी बाजार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 05:21 AM2021-02-28T05:21:13+5:302021-02-28T05:21:13+5:30
मंगरुळपीर : येथील दर शनिवारी भरविण्यात येणारा आठवडी बाजार काेराेना संसर्ग पाहता बंद ठेवण्यात आला हाेता. बाजारात व्यापारी, शेतकऱ्यांनी ...
मंगरुळपीर : येथील दर शनिवारी भरविण्यात येणारा आठवडी बाजार काेराेना संसर्ग पाहता बंद ठेवण्यात आला हाेता. बाजारात व्यापारी, शेतकऱ्यांनी येऊ नये याकरिता अधिकारी, कर्मचारी यांनी ठिय्या दिला हाेता.
संपूर्ण देशभरात कोरोना पसरू नये म्हणून विशेष काळजी घेण्यात येत असून, महाराष्ट्रातही कोरोनाला प्रतिबंध व्हावा म्हणून शासनाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. ग्रामीण आणि शहरी भागात गर्दी होऊ नये म्हणून गर्दी होणाऱ्या सर्वच घटकांवर बंदी आणण्यात आली आहे. गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग लवकर होतो म्हणून जिल्हा प्रशासनाने यात्रा, महोत्सवासह आठवडी बाजारावरही बंदी घातली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांशी आठवडी बाजार बंद ठेवण्यात आले आहेत.
शनिवारी शहरातील आठवडी बाजार असतो. तालुक्यातील शेतकरी, मजूर यांच्यासह शहरातील नागरिक बाजारात वस्तू खरेदी करण्यासाठी येत असतात. परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रशासनाने बाजाराला बंदी घातली आहे. २७ फेब्रुवारी रोजी बाजार स्थळावर सकाळपासून पालिका कर्मचारी आणि पोलिसांनी कोणत्याच व्यापाऱ्याला आणि शेतकऱ्यांना आपली दुकाने लावू दिली नाहीत. शेतकऱ्यांनी प्रचंड प्रमाणावर भाजीपाला आणि फळे विक्रीसाठी आणली होती. मात्र प्रशासनाने त्यांना दुकाने लावण्यास मज्जाव केला. तोडलेला भाजीपाला आणि फळे विकावीच लागणार असल्याने काही शेतकऱ्यांनी भाजीपाला टेम्पो, पिकअप, हातगाडीवर ठेवून संपूर्ण शहरात गल्ली-बोळांत जाऊन भाजीपाला, फळे विकण्याचा प्रयत्न केला.