नियमांचे उल्लंघन करून आठवडे बाजार सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:57 AM2021-02-26T04:57:39+5:302021-02-26T04:57:39+5:30
इंझोरी : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक सुरु असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी नियम कडक केले आहेत. त्यात आठवडे बाजार भरविण्यावर बंदी घालण्यात ...
इंझोरी : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक सुरु असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी नियम कडक केले आहेत. त्यात आठवडे बाजार भरविण्यावर बंदी घालण्यात आली आहे. इंझोरीतही या आदेशाचे पालन करण्याच्या सूचना ग्रामपंचायत प्रशासनाने दिलेल्या आहेत. तथापि, नियम झुगारून व्यावसायिकांनी गुरुवारी येथील आठवडे बाजारात दुकाने थाटली आणि तेथे खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दीही केल्याचे दिसले.
जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंतच दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी दिली असून, रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. त्यात आठवडे बाजार आणि गुरांच्या बाजारातही सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी लावली आहे. त्यामुळे सर्व ठिकाणचे आठवडे बाजार रद्द करण्यात आले आहेत. इंझोरी ग्रामपंचायतीनेही गुरूवारी भरविला जाणारा आठवडे बाजार रद्द केल्याचे जाहीर केले; परंतु ग्रामपंचायतीची सूचना आणि प्रशासनाचे नियम झुगारून अनेकांनी बाजारात दुकाने थाटली त्यामुळे तेथे खरेदीसाठी गर्दी झाल्याचे दिसले. या प्रकारामुळे गावासह परिसरात कोरोना संसर्ग वाढी होणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
इतर दिवशीही ५ वाजता नंतर दुकाने सुरूच
इंझोरीत गुरूवारी नियमांचे उल्लंघन करून दुकाने थाटल्याचे दिसून आलेत, शिवाय गावात इतरही दिवशी नियमांचे उल्लंघन करून सायंकाळी ५ वाजल्यानंतर दुकाने सुरूच ठेवण्यात येत आहेत. तथापि यावर महसूल प्रशासन आणि पोलीसही कारवाई करताना दिसत नाहीत.