इच्छूकांचे ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’; कॉर्नर मिटींगांवर दिला जातोय विशेष भर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 01:49 PM2019-09-23T13:49:42+5:302019-09-23T13:50:09+5:30

आपणास उमेदवारी मिळावी, यासाठी पक्षातीलच अनेकांनी पक्षश्रेष्ठींकडे तगडी फिल्डींग लावली आहे.

Weight and watch ; Special emphasis is given on Corner Meetings! | इच्छूकांचे ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’; कॉर्नर मिटींगांवर दिला जातोय विशेष भर!

इच्छूकांचे ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’; कॉर्नर मिटींगांवर दिला जातोय विशेष भर!

googlenewsNext

- सुनिल काकडे  
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर १९६२ मध्ये झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीपुरता खुल्या प्रवर्गासाठी राखीव असलेला तथा १९६७ पासून आजतागायत अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता राखीव राहिलेल्या वाशिम विधानसभा मतदारसंघात आगामी निवडणूक लक्ष्यवेधी होण्याचे संकेत आहेत. मतदारसंघात विकासाच्या बाबतीत बहुतांशी अपयशी ठरलेले विद्यमान आमदार लखन मलिक यांचे यंदा तिकीट कटून आपणास उमेदवारी मिळावी, यासाठी पक्षातीलच अनेकांनी पक्षश्रेष्ठींकडे तगडी फिल्डींग लावली आहे. ते ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’च्या भुमिकेत असून ग्रामीण भागात ‘कॉर्नर मिटींग’ घेण्यावर काही इच्छुकांनी भर दिल्याचे दिसून येत आहे.
१९६२ मध्ये झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणूकीत वाशिम मतदारसंघातून काँग्रेसचे स्व. रामराव झनक यांचा विजय झाला होता. १९६७ पासून अनुसूचित जातीसाठी राखीव निघाल्यानंतरही हा गड तब्बल ३० वर्षे काँग्रेसच्याच ताब्यात होता. १९९० मधील विधानसभा निवडणूकीत मात्र भाजपाने हा गड काँग्रेसकडून हिसकावून घेतला व भाजपाचे लखन मलिक यांच्या गळ्यात विजयाची माळा पडली. त्यांनी काँग्रेसचे तत्कालिन आमदार भिमराव कांबळे यांचा अल्पशा अर्थात केवळ ३९०७ मतांनी पराभव केला. त्यानंतर २००४ पर्यंत यादव शिखरे, पुरूषोत्तम राजगुरू यांच्या रुपाने मतदारसंघावर भाजपाचे निर्विवाद वर्चस्व राहिले. २००४ च्या निवडणुकीत भाजपाच्या लखन मलिक यांनी पुन्हा एकवेळ चर्चेत येत पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली; मात्र त्याचे तिकीट नाकारून पक्षाने मोतीराम तुपसांडे यांना उमेदवारी दिली. त्याचा आकस मनात ठेऊन मलिकांनी बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढली. यामुळे भाजपाच्या ताब्यात हा गड काँग्रेसच्या ताब्यात गेला.
पुढच्या अर्थात २००९ च्या निवडणुकीत मात्र भाजपाने लखन मलिक यांच्यावर विश्वास टाकून त्यांना उमेदवारी दिली आणि विश्वास सार्थ ठरत मलिकांचा विजय देखील झाला. २०१४ च्या निवडणुकीतही हाच प्रयोग कायम राहिल्याने लखन मलिक तिसऱ्यांदा आमदार झाले. असे असले तरी मतदारसंघातील वाशिम व मंगरूळपीर या दोन्ही तालुक्यांचा सर्वांगीण विकास अद्याप साध्य झाला नसल्याचे मतदारांमधून बोलले जात आहे. मोठ्या उद्योगधंद्यांअभावी वाढलेली बेसुमार बेरोजगारी, उच्चशिक्षणाचा अभाव, आरोग्यविषयक सुविधांची वाणवा, ग्रामीण भागांना जोडणारे तथा शहरांतर्गत रस्त्यांची झालेली दुरवस्था हे मुलभूत प्रश्न न सुटल्याने मतदारांचा पुरता भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळेच यंदाच्या निवडणुकीत त्यांना थांबवून उच्चशिक्षित तथा विकासाची जाण असलेल्या अन्य उमेदवारास तिकीट मिळावे, अशी अपेक्षा सुज्ञ मतदारातून व्यक्त होत आहे. याशिवाय या मतदारसंघात निवडणुक लढण्यासाठी इच्छुकांचा देखील जणू बाजार भरला असून ते पक्षश्रेष्ठीच्या निर्णयाची प्रतीक्षा करित आहेत.
दुसरीकडे मतदारसंघ निर्मितीच्या सुरूवातीपासून ३० वर्षे आणि मध्यंतरी २००४ च्या निवडणुकीत भाजपावर कुरघोडी करून विजय संपादन करणाºया काँग्रेसनेही मतदारसंघात निवडणुक लढण्याची तयारी चालविली आहे; परंतु या पक्षाकडून निवडणूक लढण्यासाठी इच्छुकांमध्ये फारशी चढाओढ सुरू नसल्याचे दिसत आहे. जिल्ह्याच्या राजकारणात वलय अगदीच कमी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचाही आवाज बहुतांशी दबला असून भारिप बहुजन महासंघाकडून मात्र वाशिम विधानसभा मतदारसंघात तगडा उमेदवार देऊन शर्थीची झुंज देण्याचा प्रयत्न होईल, असे राजकीय जाणकारांमधून बोलले जात आहे. असे असले तरी कुठल्याही प्रमुख पक्षाकडून अद्यापपर्यंत अधिकृतपणे उमेदवारांच्या नावाची घोषणा झाली नसल्याने इच्छुकांनी ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ची भुमिका घेऊन आपापल्या पद्धतीने मतदारांच्या भेटीगाठी घेणे सुरू केले आहे. वाशिम व मंगरूळपीर तालुक्यातील ग्रामीण भागात हे इच्छुक उमेदवार मतदारांच्या घरांसमोर दिसून येत आहेत. काहीठिकाणी राजकीय पक्षांचे मेळावे घेऊन शक्तीप्रदर्शन देखील केले जात आहे. निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने काय करावे आणि काय करू नये, याचे भान ठेऊनच इच्छुकांकडून निवडणुकीची तयारी सुरू असल्याचेही पाहावयास मिळत आहे.
प्लास्टिकच्या प्रचार साहित्यावर बंदी
निवडणुकीमध्ये पर्यावरणपूरक साहित्याचा वापर व्हावा, अशी अपेक्षा निवडणूक आयोगाने व्यक्त केली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी व उमेदवारांनी आपल्या प्रचारासाठी प्लास्टिकचा उपयोग करू नये. त्याऐवजी पर्यावरणपूरक वस्तुंचा साहित्याचा वापर करावा.
सोशल मीडिया व पेड जाहिरातींवर लक्ष
निवडणूक काळात सोशल मीडिया व पेड जाहिरातींवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. प्रचारार्थ जाणारी प्रत्येक जाहिरात तपासण्यासाठी मीडिया सर्टिफिकेशन अ‍ॅण्ड मॉनिटरिंग (एमसीएमसी) कमिटीची नव्याने पुनर्रचना करण्यात आली आहे. यात सोशल मीडियाचे तज्ज्ञ राहतील. ते लक्ष ठेवतील.

Web Title: Weight and watch ; Special emphasis is given on Corner Meetings!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.