व्यावसायिक दुकानांमधील वजनमापांची तपासणी कागदोपत्रीच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 03:52 PM2018-11-21T15:52:24+5:302018-11-21T15:52:41+5:30
दुकानांमधील वजनमापांची तपासणी कागदोपत्रीच उरकली जात असल्याने ग्राहकांची फसवणूक होण्याचा प्रकार सुरूच असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : व्यापारपेठेतील व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्ये असलेले साधे वजनकाटे, इलेक्ट्रीक वजनकाट्यांची वेळोवेळी तपासणी करणे, अधिकृत वजनकाट्यांना प्रमाणित करून त्यावर मुद्रांकन करण्याची जबाबदारी असलेल्या वैधमापन शास्त्र विभागाचे कामकाज सद्या पुरते ढेपाळले असून दुकानांमधील वजनमापांची तपासणी कागदोपत्रीच उरकली जात असल्याने ग्राहकांची फसवणूक होण्याचा प्रकार सुरूच असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
वजन माप विषयक अधिनियम व नियमांच्या तरतुदींची अंमलबजावणी करणारी यंत्रणा म्हणून वैधमापन शास्त्र विभाग ओळखला जातो. या विभागांतर्गत जिल्हास्तरीय निरीक्षक विभागाच्या कार्यालयाकडून व्यापारपेठेतील व्यावसायिक दुकानांमध्ये असलेल्या वजन व मापांची पडताळणी केली जाते व त्या वजन मापांवर मुद्रांकन केले जाते. असे असले तरी वाशिमसह अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांमध्ये वैधमापन शास्त्र विभागाचा कारभार आलबेल झाला आहे. वाशिममध्ये तर एका छोट्याश्या भाड्याच्या खोलीत गेल्या कित्येक वर्षांपासून या विभागाचे कामकाज सुरू आहे. विशेष गंभीर बाब म्हणजे या कार्यालयाला अद्याप स्वतंत्र विद्यूत मीटर नसल्याने शेजारच्या एका इसमाकडून ठराविक रक्कम देवून वीज घेतली जाते. व्यापारपेठेतील व्यावसायिक दुकानांमध्ये योग्य त्या सर्व बाबींची तपासणी न करताच वजनकाट्यांचे ‘पासींग’ केले जाते. यामुळे ग्राहकांची फसवणूक होण्याचा प्रकार राजरोसपणे सुरूच असल्याचे सूत्रांनी सांगितले.
वैधमापन शास्त्र विभागांतर्गत व्यावसायिक दुकानांमधील वजनमापांची नियमित तपासणी केली जाते. नियमानुसार सर्व बाबींची पडताळणी करूनच वजनकाटे ‘पास’ केले जातात. यासंबंधी ग्राहकांची कुठलीही तक्रार असल्यास ते विभागाकडे करू शकतात, त्याचीही दखल घेतली जाईल.
- बी.बी. गायकवाड
निरीक्षक, वैधमापन शास्त्र विभाग, वाशिम