फटाक्यांची आतषबाजी करून मुलीच्या जन्माचे स्वागत; करंजीत साजरा झाला आनंदोत्सव
By सुनील काकडे | Published: June 8, 2023 05:30 PM2023-06-08T17:30:18+5:302023-06-08T17:30:27+5:30
मुलांच्या तुलनेत मुलींचा जन्मदर आजही घटलेलाच आहे. हे चित्र बदलण्यासाठी शासनस्तरावरून ‘लेक वाचवा-लेक शिकवा’ अभियान राबविण्यात येत आहे.
सुनील काकडे
वाशिम : मुलगी जन्माला आल्याने तिचे स्वागत जंगी व्हायला हवे, अशी तिच्या आईची इच्छा माहेरच्यांनी पूर्ण केली. प्रसूती झाल्यानंतर दवाखान्यातून घरी आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी करून नवजात मुलगी व तिच्या मातेचे हर्षोल्लासात स्वागत झाले. करंजी (ता.मालेगाव) येथे बुधवारी हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
मुलांच्या तुलनेत मुलींचा जन्मदर आजही घटलेलाच आहे. हे चित्र बदलण्यासाठी शासनस्तरावरून ‘लेक वाचवा-लेक शिकवा’ अभियान राबविण्यात येत आहे. याशिवाय स्त्री जातीच्या अर्भकाची गर्भातच हत्या करण्याचा प्रकार कायमचा संपविण्याच्या उद्देशाने गर्भलिंगनिदान चाचणीवर सक्तीने बंदी असलेल्या कायद्याचीही प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. तरीदेखील वंशाला दिवाच हवा, असा अट्टहास असलेल्या काही कुटूंबात छुप्या पद्धतीने स्त्रीभ्रूण हत्येचा प्रकार आजही घडतच आहे. दुसरीकडे मात्र लेकीच्या जन्माचा आनंदोत्सव साजरा करणारे देखील याच समाजातच वावरत असल्याची प्रचिती करंजीतील नागरिकांना अनुभवता आली.
गोहगाव (ता.रिसोड) हे सासर आणि करंजीत माहेर असलेल्या सारिका स्वप्निल हाडे हिची प्रसूती वाशिम येथील एका खासगी रुग्णालयात झाली. मुलगी जन्माला आल्याचे समजताच सारिकाने तिचे स्वागत जंगी व्हावे, अशी इच्छा भाऊ प्रदिप लहानेजवळ व्यक्त केली. वडिल डिगांबर लहाने यांनी त्यास नुसती परवानगीच दिली नाही; तर त्यांच्यासह अख्खे कुटूंब सारिका व तिच्या नवजात लेकीचे स्वागत करण्याच्या तयारीत गुंतले.
मायलेकींचे झाले अभुतपूर्व स्वागत
दोघी मायलेकी घराच्या उंबरठ्यावर येताच फटाक्यांची आतषबाजी आणि फुलांची उधळण करत तथा पुजन व औक्षण करून दोघींचेही अभुतपूर्व स्वागत करण्यात आले. हा आनंदाचा सोहळा पाहण्यासाठी करंजीतील महिला-पुरूषांसह मुलामुलींनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले.