वाशिम तालुक्यातील तीन गावांतील रोहयोच्या विहिरींची मजुरी रखडली; शेतकरी, मजुर अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 02:03 PM2018-01-22T14:03:03+5:302018-01-22T14:04:58+5:30
वाशिम: मजुरांच्या हाताला काम देण्यासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली. मात्र या योजनेला दिरंगाई आणि गैरप्रकाराची वाळवी लागल्याचे चित्र वाशिम तालुक्यात पाहायला मिळत आहे. या योजनेंतर्गत सहा वर्षभरापूर्वी काम पूर्ण झालेल्या विहिरींचे अनुदान आणि कामगारांना मजुरी अद्यापही मिळालेली नाही. त्यामुळे संबंधित शेतकरी आणि कामगारांवर आर्थिक संकटच ओढवले आहे.
वाशिम तालुक्यातील जांभरूण, जहॉगीर, शेलगाव, दगडउमरा या गावामध्ये शेतकठयांनी रोजगार हमी योजनेतून वर्षभरापूर्वी विहिरीचे कामे केली. जॉब कार्डच्या माध्यमातून मजुरांच्या हातून खोदकाम करून घेतले. मात्र अद्यापही मजुरांच्या खात्यात त्यांची मजुरी जमा झाली नाही. विहिरीचे लाभाथी हरिभाऊ अश्रुजी राऊत यांनी विहिरीचे संपुर्ण बांधकाम खोदकाम पूर्ण करूनही शासनाकडून कोणतीही मदत मिळाली नाही. शिवाय मजुरांना मजुरी मिळाली नाही. एका वर्षांपासून शेतकरी पंचायत समितीमधील कार्यरत असलेल्या रोजगार हमी योजनेचे अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संपर्क साधून आहेत. मात्र अधिकारी अनुदानासाठी टाळाटाळ करीत आहेत. शासनाने सुरू केलेल्या रोजगार हमी योजना ही योजना नसून कायद्या आहे. कायद्यानुसार हक्काचा रोजगार व हक्काची मजुरी देणे बंधनकारक आहे. त्यामुळे मजुरांना रोजगारापासून वंचित ठेवणे गुन्हा ठरू शकतो. याची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी यातीलच एक शेतकरी हरिभाऊ राऊत यांनी केली आहे. जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांची रोजगार हमीची कामे ठप्प झाली असून शेतकºयांनी खोदलेल्या विहिरीचा मोबदला मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. हरिभाऊ राऊत यांनी स्वत:ची एक एकर शेती विकून मजुरांची मजुरी व बांधकामाचे पैसे दिले. वर्षभरापासून अद्यापही अनुदान न मिळाल्याने ते अडचणीत सापडले आहे.