पश्चिम व-हाड जलमय!
By Admin | Published: August 6, 2015 12:14 AM2015-08-06T00:14:02+5:302015-08-06T00:14:02+5:30
तीस तास संततधार, महिला वाहून गेली, अनेक गावांचा संपर्क तुटला, काही राज्य मार्गही बंद !
अकोला- सोमवारपासून सलग ३0 तास सुरू असलेल्या संततधार पावसाने पश्चिम वर्हाडातील अकोला, बुलडाणा आणि वाशिम जिल्हे जलमय झाले आहेत. पुरामुळे काही राज्य मार्ग बंद झाले असून, तीनही जिल्ह्यांतील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अकोला जिल्ह्यात पुरामध्ये वृद्ध महिला वाहून गेली, तर बाळापूर तालुक्यात नाल्याच्या पुरामध्ये पेट्रोलचा टँकर अडकला. अकोला जिल्ह्यात बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासांत सरासरी १७९.४३ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, सातही तालुक्यांत अतवृष्टी झाली. पूर्णा नदीला आलेल्या पुरामुळे बुधवारी दुपारी ३ पर्यंत अकोला-आकोट मार्गावरील गांधीग्रामच्या पुलावरून २५ फूट पाणी वाहत होते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद होती. मोर्णा नदीला आलेल्या पुरामुळे अकोला शहरानजीकच्या चांदूर गावाचा संपर्क तुटला तसेच विद्रूपा नदीला आलेल्या पुरामुळे तेल्हारा तालुक्यात तळेगाव वडनेर, नवी उमरी, तळेगाव पातुर्डा या गावांचा संपर्क तुटला. बाळापूर तालुक्यात अंदुरा येथील पानखास नाल्याला आलेल्या पुरामुळे शेगाव-आकोट मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. अकोला-दर्यापूर मार्गही बंद होता. पानखास नाल्याला आलेल्या पुरात पेट्रोलचा टँकर अडकला असून, टँकरच्या टपावर चढलेल्या चालक व क्लीनरला पुरातून बाहेर काढण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून प्रयत्न सुरू होते.अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पात बुधवारी सायंकाळपर्यंत १८.५ टक्के, तर वाण प्रकल्पात ६२.२५ टक्के जलसाठा झाला होता. बुलडाणा जिल्ह्यात सरासरी १४४.२ मि.मी. पाऊस झाला. या पावसामुळे शेगाव तालुक्यातील खिरोडा आणि नांदुरा तालुक्यातील येरळी येथील पुलावरून बुधवारी दुपारी ४ वाजेपर्यंत आठ फूट पाणी वाहत होते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. परिणामी जळगाव, संग्रामपूर, मलकापूर, नांदुरा तालुक्यांचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यातील लहान-मोठय़ा प्रकल्पामध्ये जलसाठा वाढला आहे. जिल्ह्यात ३ मोठे, ७ मध्यम, ७ महामंडळाचे तर ७४ लघू प्रकल्प आहेत. नळगंगा प्रकल्पात उपयुक्त साठा १५.३८ दलघमी आहे. याची टक्केवारी २२.१८ आहे. पलढग प्रकल्पाचा उपयुक्त साठा २.६८ दलघमी आहे. वाशिम जिल्हय़ात सरासरी १६४.२0 मि.मी. पाऊस पडला. नदी, नाल्यांना आलेल्या पुरामुळे प्रकल्पांच्या पाण्यात मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. कारंजा परिसरात तीन मजली इमारतीचा एक भाग कोसळला, तर काही ठिकाणी झाडेही उन्मळून पडली आहेत. जिल्हय़ात सर्वाधिक पाऊस कारंजा तालुक्यात, तर त्या पाठोपाठ मंगरुळपीर तालुक्यात झाला. जिल्ह्यातील एकबुर्जी प्रकल्पात ८ टक्के, सोनल प्रकल्पामध्ये १३ टक्के, अडाणमध्ये २४ टक्के, तर जिल्ह्यातील लघु प्रकल्पांमध्ये १४ टक्के जलसाठा होता. आता या जलसाठय़ात वाढ झाली आहे.
वृद्ध महिला वाहून गेली
तेल्हारा तालुक्यात नागझरी नाल्याला आलेल्या पुरात वाडी अदमपूर येथील मंदिरात झोपलेली रेश्माबाई पंढरी भोजने (९0) ही वृद्ध महिला वाहून गेली. रेशमाबाईचा मृतदेह तीन किलोमीटर अंतरावर सापडला.