वाशिम जिल्ह्यात सततधार पावसामुळे ओल्या दुष्काळाचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 12:40 PM2020-09-12T12:40:21+5:302020-09-12T12:40:35+5:30
शेतात पाणी साचून पिके पुन्हा पिवळी पडू लागली असल्याने जिल्ह्यावर ओल्या दुष्काळाचे सावट ओढवल्याचे चित्र आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात आॅगस्ट महिन्याच्या उत्तरार्धापासून सतत पावसाची रिपरिप सुरू आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात उसंत घेतल्यानंतर पुन्हा सतत पाऊस पडत आहे. त्यात गेल्या पाच दिवसांपासून पावसाने जिल्ह्यात ठाणच मांडले आहे. त्यामुळे शेतात पाणी साचून पिके पुन्हा पिवळी पडू लागली असल्याने जिल्ह्यावर ओल्या दुष्काळाचे सावट ओढवल्याचे चित्र आहे.
वाशिम जिल्ह्यात आॅगस्ट महिन्यात १० तारखेनंतर जिल्ह्यात १५ ते २० दिवस पावसाने ठाण मांडले. त्यामुळे काढणीवर आलेल्या उडिद, मुग पिकासह सोयाबीनच्या पिकाला मोठा फटका बसला. अनेक शेतात पाणी साचून उडिद, मुगाच्या शेंगा कुजल्या, सोयाबीन पिवळे पडल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसा झाले. या पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे निर्देशही २५ आॅगस्ट रोजीच शासनाने दिले असून, अद्यापही पंचनामे पूर्ण होऊ शकले नाहीत.
आॅगस्टमधील सततच्या पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीस पावसाने तीन चार दिवस पावसाने उसंत घेतली. त्यामुळे शेतकऱ्यांनी उडिद, मुगाच्या काढणीला वेग दिला; परंतु पुन्हा पावसाने जिल्ह्यात ठाण मांडले.
गेल्या पाच ते सहा दिवसांपासून सतत पाऊस पडत असल्याने शेतात पाणी साचत आहे. यामुळे आता सोयाबीनसह तूर, कपाशी आणि ज्वारीचे पीकही संकटात सापडले असून, जिल्ह्यात ओला दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाल्याचे दिसत आहे.
पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली
वाशिम जिल्ह्यात वार्षिक सरासरी ७७५.७० मि. मी. पाऊस अपेक्षीत असतो. गतवर्षी १ जून ते ९ सप्टेंबरपर्यंतच्या कालावधित ५४३.६० मि.मी. अर्थात वार्षिक सरासरीच्या ७७.८० टक्केच पाऊस पडला होता. यंदा मात्र पावसाने आॅगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंतच वार्षिक सरासरी ओलांडली आहे. प्रत्यक्षात जिल्ह्यात जून ते ९ सप्टेंबरपर्यंत एकूण ८०८.३० मि.मी. पाऊस पडला. हे प्रमाण सरासरीच्या ११५ टक्के आहे. अद्यापही जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. त्यात ९ सप्टेंबर ते १० सप्टेंबरच्या सकाळी ७ वाजेपर्यंत २४ तासांच्या कालावधित २३.१० मि.मी. पावसाची नोंद झाली. अद्यापही पावसाळा संपण्यास किमान २० दिवसांचा कालावधी उरला आहे. या काळातही पावसाची रिपरिप कायम राहिल्यास यंदाचा खरीप हंगामच शेतकºयांच्या हातून जाण्याची भीती निर्माण झाली आहे.