डॉक्टरांच्या कुटुंबीयांच्या आरोग्य सुरक्षेचे काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:42 AM2021-04-04T04:42:52+5:302021-04-04T04:42:52+5:30
कोरोना विषाणू संसर्ग संकटाच्या पहिल्या लाटेत उपचार करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी आधी १४ दिवस आणि नंतर पाच दिवस ‘क्वारंटाईन’ची व्यवस्था ...
कोरोना विषाणू संसर्ग संकटाच्या पहिल्या लाटेत उपचार करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी आधी १४ दिवस आणि नंतर पाच दिवस ‘क्वारंटाईन’ची व्यवस्था करण्यात आली होती. सध्या मात्र राज्यभरातील सर्वच जिल्ह्यांमध्ये दररोज उपचारानंतर डाॅक्टर आणि कर्मचारी थेट घरी जात आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांची आरोग्य सुरक्षा धोक्यात सापडली आहे. डाॅक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांच्या घरी लहान मुले, ज्येष्ठ नागरिक असतात. त्यांच्या आरोग्य सुरक्षेचे काय, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
...................
जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर्स - १०
या सेंटरमध्ये दाखल असलेले रुग्ण - ४६८
या सेंटरमधील आरोग्य कर्मचारी - ११५
...................
मुलाबाळांची काळजी वाटतेय पण...
गत वर्षभरापासून कोरोना विषाणू संसर्गाचे संकट ठाण मांडून आहे. या काळात असंख्य कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्याची, त्यांची प्रत्यक्ष सेवा करण्याची संधी मिळाली. कुटुंबीयांची काळजी आहेच; पण कर्तव्यही महत्त्वाचे आहे.
- शारदा जाधव
.................
घरी पत्नी, लहान मुले आहेत. त्यामुळे ड्यूटी आटोपून घरी परतल्यानंतर निश्चितपणे भीती वाटतेच; पण आता सवय पडली आहे. घरी जाताच सर्वात आधी गरम पाण्याने अंघोळ करून नंतरच कुटुंबीयांसोबत एकत्र येतो. त्यामुळे थोडी सुरक्षितता वाटते.
- महेंद्र साबळे
...............
कोरोना बाधित रुग्ण समाजाचाच एक घटक आहेत. त्यांना बहिष्कृत करून कसे जमणार? याउलट त्यांची विशेष काळजी घेऊन त्यांना लवकर बरे करण्याचा आमचा प्रयत्न असतो. ड्यूटी संपल्यानंतर घरी जाताना भीती वाटते; पण आता सवय झाली आहे.
- प्रियांका गायकवाड
.............
माझी पत्नी कोरोना बाधितांची सेवा करीत आहे. ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. घरी लहान मुलगी आहे, मीच तीची काळजी घेतो. पत्नी घरी परतल्यानंतर तिलाही मानसिक आधार देतो.
- अतुल ताठे
.......................
घरी वृद्ध आई आणि दोन लहान मुले आहेत. पत्नी ड्यूटीवर गेल्यानंतर तिघांचाही सांभाळ मीच करतो. घरी परतल्यानंतर तीच्या मनात भीती असतेच; पण रुग्णसेवा सर्वोच्च आहे.
- गजानन कष्टे
............................
कोट :
कोरोना विषाणू संसर्गाने बाधित असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यात डाॅक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी कुठलीच कसर सोडलेली नाही. दुसरीकडे कुटुंबीयदेखील सुरक्षित राहावे, ही त्यांची अपेक्षा आहे. ड्यूटीच्या वेळा ठरवून देण्यात आल्या आहेत. याशिवाय नाईट ड्यूटी झाली की दोन दिवसांचा ‘ऑफ’ही दिला जातो. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे.
- डाॅ. मधुकर राठोड
जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम