बारावीच्या परीक्षेवर पर्याय काय? शासन विचारात; विद्यार्थी संभ्रमात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:46 AM2021-05-25T04:46:26+5:302021-05-25T04:46:26+5:30

वाशिम : कोरोनामुळे पहिली ते नववीच्या आणि त्यानंतर दहावीच्या परीक्षा शासनाने रद्द केल्या. यामुळे बारावी परीक्षेचे काय होणार, यावर ...

What are the options for 12th standard exam? Governance in consideration; Students in confusion! | बारावीच्या परीक्षेवर पर्याय काय? शासन विचारात; विद्यार्थी संभ्रमात !

बारावीच्या परीक्षेवर पर्याय काय? शासन विचारात; विद्यार्थी संभ्रमात !

Next

वाशिम : कोरोनामुळे पहिली ते नववीच्या आणि त्यानंतर दहावीच्या परीक्षा शासनाने रद्द केल्या. यामुळे बारावी परीक्षेचे काय होणार, यावर पर्याय काय? याबाबत शासनस्तरावर विचार सुरू आहे. दुसरीकडे परीक्षा केव्हा होणार, यावर काय पर्याय निघणार हे अद्याप निश्चित नसल्यामुळे विद्यार्थी संभ्रमात असल्याचे दिसून येते.

गतवर्षी मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर २३ नोव्हेंबरला नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले होते. त्यानंतर जानेवारी २०२१ मध्ये पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले; परंतुु कोरोनाची दुसरी लाट आल्याने सर्वच शाळेचे वर्ग विद्यार्थ्यांसाठी बंद झाले. दुसरीकडे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन पद्धतीने शिक्षणाचे धडे देण्यात आले. कोरोनामुळे पहिली ते दहावीच्या परीक्षादेखील रद्द करण्यात आल्या. अजूनही कोरोनाचा प्रभाव कायम असल्याने बारावीच्या परीक्षा नेमक्या केव्हा होणार किंवा यावर पर्याय काय? याबाबत विद्यार्थी संभ्रमात आहेत. स्पर्धा परीक्षेसारखी वस्तुनिष्ठ स्वरूपात २०० गुणांची परीक्षा घ्यावी, असाही पर्याय शिक्षण तज्ज्ञ, विद्यार्थ्यांमधून सुचविला जात आहे. बारावीच्या परीक्षेवर पर्याय काय? याबाबत शासन स्तरावर विचार सुरू आहे. बारावीच्या परीक्षेवरच अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी यासह इतर पदवी शिक्षणाचे प्रवेश अवलंबून असल्याने बारावीची परीक्षा होईल, असे शिक्षणतज्ज्ञांना वाटते. कोरोनामुळे परीक्षा लांबणीवर पडली तरी हरकत नाही; परंतु विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून परीक्षा व्हायलाच हवी, असा सूर विद्यार्थी व पालकांमधून उमटत आहे.

००००००००००००

काय असू शकतो पर्याय?

कोट

बारावीची परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक करिअरला टर्निंग पॉईंट देणारी आहे. त्यामुळे दहावीप्रमाणे बारावीची परीक्षा रद्द करता येणार नाही, असे वाटते. कोरोनाचा आलेख खाली आल्यानंतर परीक्षा होऊ शकते. परीक्षेतील गुणानुसार पुढील प्रवेश मिळणार असल्याने परीक्षा व्हायलाच हवी.

- प्रा. वसंत देशमुख, शिक्षणतज्ज्ञ.

०००

बारावीच्या परीक्षेवर अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी यासह अन्य पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेश अवलंबून असतात. त्यामुळे बारावीची परीक्षा होईलच, असा एकंदरीत अंदाज आहे. विद्यार्थ्यांनीदेखील बारावीच्या अभ्यासात खंड पडू न देता सातत्य ठेवायला हवे.

- आकाश आहाळे, शिक्षणतज्ज्ञ.

००००

विद्यार्थी जीवनात बारावी परीक्षेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बारावीची परीक्षा रद्द न करता वस्तुनिष्ठ स्वरूपात (ऑब्जेक्टिक प्रश्न) परीक्षा घ्यायला हवी. यामुळे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होऊन गुणांकनदेखील काढता येईल. पेपर तपासणीदेखील सुलभ होईल.

- प्रा. विजय पोफळे, शिक्षणतज्ज्ञ.

००००

परीक्षेबाबत विद्यार्थी संभ्रमात

कोट

बारावीच्या परीक्षेतील गुणांवरच पुढील प्रवेश पद्धती अवलंबून आहे. कोरोनामुळे प्रत्यक्ष शाळेत जाऊन शिक्षण घेता आले नाही. ऑनलाईन पद्धतीने शिकविण्यात आले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून परीक्षा घ्यायलाच हवी.

- वंदना मानोरकर, विद्यार्थिनी.

००

कोरोनामुळे पहिली ते दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत. दहावी परीक्षेसंदर्भात प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट झाले आहे. त्यामुळे बारावी परीक्षेचे काय होणार याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. या संभ्रमामुळे विद्यार्थी गोंधळून जात असल्याचे दिसून येते.

- गौरव देशमुख, विद्यार्थी.

००

कोरोनामुळे बारावीच्या परीक्षा लांबणीवर पडल्या आहेत. परीक्षा होणार की नाही, कोणत्या पद्धतीने परीक्षा होणार यावर पर्याय काय? आदी प्रश्न सध्यातरी अनुत्तरित आहेत. यामुळे विद्यार्थीदेखील संभ्रमात आहेत. परीक्षेबाबत लवकर निर्णय व्हायला हवा.

- गीतांजली चव्हाण, विद्यार्थिनी.

०००००००

जिल्ह्यातील बारावीचे एकूण विद्यार्थी - १८,१७५

मुले - ९,९८७

मुली - ८,१८८

००००००००००

Web Title: What are the options for 12th standard exam? Governance in consideration; Students in confusion!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.