अनाथ, निराधारांनी काय खायचे? कोरोनामुळे दातृत्वाचा झरा आटतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 12:58 PM2021-04-06T12:58:21+5:302021-04-06T12:58:33+5:30

Washim News : कोरोनाच्या संकटामुळे दातृत्वाचा झराही आटल्यागत परिस्थिती निर्माण झाली आहे.

What do orphans and destitute people eat | अनाथ, निराधारांनी काय खायचे? कोरोनामुळे दातृत्वाचा झरा आटतोय

अनाथ, निराधारांनी काय खायचे? कोरोनामुळे दातृत्वाचा झरा आटतोय

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : गेल्या एक वर्षापासून कोरोना विषाणू संसर्गाचे संकट घोंगावत आहे. अनाथाश्रम, वृद्धाश्रम, आदी सेवाभावी संस्थादेखील यामुळे अडचणीत आल्या आहेत. कोरोनाच्या संकटामुळे दातृत्वाचा झराही आटल्यागत परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनस्तरावरूनही अशा दुर्लक्षित घटकाकडे कानाडोळा केला जात असल्याने संबंधितांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. 
जिल्ह्यातील वाशिम शहरात जुने आययूडीपी काॅलनीत अंध मुलांची निवासी शाळा आहे. त्यात गतवर्षीपर्यंत ५६ मुले शिकायला व वास्तव्याला होती. १६ मार्च २०२० पासून लाॅकडाऊन जाहीर झाला आणि त्यानंतर संबंधित मुलांनाही त्यांच्या पालकांकडे रवाना करून शाळेला कुलूप लावण्यात आले. तेव्हापासून आजतागायत अंध, दिव्यांग मुले परतली नसून, त्यांचे अक्षरश: हाल होत आहेत. केकतउमरा (ता. वाशिम) येथे पांडुरंग उचितकर या समाजसेवकाचा मुलगा दोन्ही डोळ्यांनी अंध आहे. असे असताना ध्येयवेड्या पांडुरंगने आणखी १४ अंध मुले दत्तक घेऊन त्यांचे पालनपोषण करणे सुरू केले. समाजातील काही दानदाते स्वत:हून मदत करीत असत. 
याशिवाय संगीतात पारंगत असलेली ही अंध मुले विविध ठिकाणी कार्यक्रम घेऊन चरितार्थ चालवत होती. कोरोनामुळे मात्र गत वर्षभरापासून या सर्व मुलांची दैना होत आहे. जिल्ह्यातील अनाथाश्रम, वृद्धाश्रम, भटक्या मुलांच्या निवासी शाळाही बंद असल्याने अनाथ, निराधारांनी नेमके खायचे काय, असा बिकट प्रश्न उभा ठाकला आहे.


अंध मुले भेटणार जिल्हाधिकाऱ्यांना
केकतउमरा येथील चेतन ऑर्केस्ट्रा ग्रुपची चाैदाही अंध मुले लवकरच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आम्ही जगायचे कसे, असा प्रश्न त्यांना करणार आहेत. भीक नको; पण किमान सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी द्या, त्यावर उदरनिर्वाह करू, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली जाणार आहे.


मी गेल्या अनेक वर्षांपासून कायम विनाअनुदानित तत्त्वावर अंध मुलांसाठी निवासी शाळा चालवत आहे. त्यात गतवर्षीपर्यंत ५६ मुले होती. त्यांच्या पालनपोषणात कुठलीच उणीव ठेवली नाही; मात्र १६ मार्चपासून शाळा बंद आहे. मुलांना त्यांच्या पालकांकडे पाठवून दिले आहे. त्या मुलांचे आता हाल सुरू आहेत.
- लोकचंद राठोड, सामाजिक कार्यकर्ते
 

Web Title: What do orphans and destitute people eat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम