प्राथमिक शिक्षकांची पदोन्नती केव्हा? शिक्षक कृती समितीचा सवाल
By संतोष वानखडे | Published: August 11, 2023 04:53 PM2023-08-11T16:53:25+5:302023-08-11T16:54:12+5:30
अधिकाऱ्यांशी चर्चा
संतोष वानखडे, वाशिम : वाशिम जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न रेंगाळलेला असून, शिक्षकांच्या संयमाचा अंत पाहू नका असा निर्वाणीचा इशारा शिक्षक कृती समितीने शिक्षण विभागाला दिला. यासंदर्भात शिक्षक आमदारांसह शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदनही दिले.
प्राथमिक शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित असून, तो सोडवण्यासाठी शिक्षक कृती समितीने अनेकवेळा निवेदने, तोंडी चर्चा केली. पदोन्नतीचा प्रश्न निकाली काढण्यासंदर्भात पाठपुरावा केला. परंतु अजूनपर्यंत पदोन्नतीचा प्रश्न सुटला नाही. जिल्ह्यातील अनेक केंद्रप्रमुखांची पदे रिक्त असल्यामुळे काही केंद्रप्रमुखावर तीन ते चार केंद्राची जबाबदारी देण्यात आली. उच्चश्रेणी मुख्याध्यापकांचीही अनेक पदे रिक्त असून त्या पदाचा पदभार सहाय्यक शिक्षकांकडे असल्यामुळे शिक्षण तथा शाळेच्या नियोजनावर विपरित परिणाम होत असल्याचे शिक्षक कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनात नमूद केले. समस्या निवारण सभेतही शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न निकाली काढण्याची मागणी आमदार ॲड. किरणराव सरनाईक यांच्याकडे केली.
पदोन्नतीचा प्रश्न त्वरित सोडवावा असे निर्देश शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी वाशिम जि.प.शिक्षक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय इढोळे, पतसंस्थेचे उपाध्यक्ष तथा अखिल भारतीय शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय मनवर, संचालक रा.सु.इंगळे, जगन्नाथ आरु, प्रशांत वाझुळकर, अजयकुमार कटके , संतोष बांडे , किशोर जुनघरे , पुरुषोत्तम तायडे, छत्रगुघ्न गवळी, संतोष बांडे, सुनील इंगोले, संजय सोनोने, राष्ट्रवादी शिक्षक संघटना व अखिल भारतीय शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.