सिंचन करताना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:42 AM2021-02-09T04:42:35+5:302021-02-09T04:42:35+5:30
वाशिम : तांत्रिक बिघाडामुळे वीज पुरवठा खंडित होणे, नादुरुस्त विद्युत रोहित्र बदलून देण्यास विलंब आदी बाबींमुळे सिंचन करताना शेतकऱ्यांना ...
वाशिम : तांत्रिक बिघाडामुळे वीज पुरवठा खंडित होणे, नादुरुस्त विद्युत रोहित्र बदलून देण्यास विलंब आदी बाबींमुळे सिंचन करताना शेतकऱ्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. याकडे महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी काॅंग्रेस कमिटीचे वाशिम तालुकाध्यक्ष महादेव सोळंके यांनी ८ फेब्रुवारी रोजी केली.
००००
वाशिम-रिसोड रस्ता काम पूर्णत्वाकडे
रिठद : वाशिम-रिसोड या रस्त्याचे रुंदीकरण, डांबरीकरणाचे काम रिठद परिसरात पूर्णत्वाकडे येत आहे. रुंदीकरण व डांबरीकरणामुळे वाहनचालकांची गैरसोय टळत असून, सध्या आसेगाव-वनोजा परिसरात रस्त्याचे डांबरीकरण केले जात आहे.
००००००
कीड नियंत्रणाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन
केनवड : वातावरणातील बदलामुळे गहू, हरभरा आदी पिकांवर विविध किडींचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे. कीड नियंत्रणाबाबत शेतकऱ्यांनी कोणत्या उपाययोजना कराव्या आणि कीटकनाशक फवारणी करताना कोणती दक्षता घ्यावी, याबाबत कृषी विभागाने सोमवारी केनवड परिसरात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
०००००
दवाखाना इमारत दुरुस्तीकडे दुर्लक्ष
धनज बु.: येथून जवळच असलेल्या राहाटी येथील आयुर्वेदिक दवाखान्याची इमारत दोन वर्षांपासून शिकस्त झाली आहे. इमारत दुरुस्तीची मागणी करूनही, या इमारतीच्या दुरुस्तीकडे संबंधित यंत्रणेने अद्याप लक्ष दिले नाही.
००००००००
निकृष्ट बियाण्यांच्या भरपाईची प्रतीक्षा
पोहरादेवी : पोहरादेवीसह मानोरा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांवर खरीप हंगामात निकृष्ट बियाण्यांमुळे दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. खरीप हंगाम संपला तरी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नाही.
००००
पाणंद रस्त्यावरील पुलाचे काम प्रलंबित
इंझोरी: पिंपळगाव-इंझोरी या पाणंद रस्त्यावरील पूल अडीच वर्षांपूर्वी पुरात वाहून गेला. यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने आमदारांनी विधानसभेत तारांकित प्रश्न केल्यानंतर गत महिन्यात तीन विभागांच्या अधिकाऱ्यांनी या पुलाची पाहणी व मोजमाप केले होते. परंतु दीड महिना उलटला तरी, पुलाचे काम सुरू झाले नाही.