पशुसंवर्धन विभागातील आठ पदे केव्हा भरणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:29 AM2021-06-03T04:29:10+5:302021-06-03T04:29:10+5:30
वाशिम : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागात वर्ग दोन दर्जाची आठ पदे रिक्त असल्याने प्रशासकीय कामकाज बऱ्याच अंशी प्रभावित होत ...
वाशिम : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागात वर्ग दोन दर्जाची आठ पदे रिक्त असल्याने प्रशासकीय कामकाज बऱ्याच अंशी प्रभावित होत आहे. गत वर्षभरापासून ही पदे भरण्यात आली असून, अधिकारी केव्हा मिळणार, याकडे पशुपालकांचे लक्ष लागून आहे.
जिल्ह्यातील श्रेणी एकचे १७ व श्रेणी दोनचे ४१ अशा एकूण ५८ पशुवैद्यकीय दवाखाना व उपचार केंद्रांमधून जनावरांना वैद्यकीय सेवा दिली जाते. जिल्ह्यात साडेतीन लाखांच्या आसपास पशुधन असून, पशुधनाचे ‘आरोग्य’ सांभाळण्यासाठी श्रेणी एकच्या दवाखान्यावर एलडीओ दर्जाची २१ पदे मंजूर आहेत. पशुधन विकास अधिकाऱ्यांची काही पदे रिक्त असल्याने या पदांचा प्रभार कार्यरत अन्य अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे.
वर्ग दोनची आठ पदे रिक्त आहेत. त्यातही पशुवैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी ‘पदवीधर’ सापडत नसल्याने शवविच्छेदन अहवाल व इतर जबाबदार प्रस्ताव, कागदपत्र, प्रमाणपत्र देण्यातही अनेक वेळा अडचणी येतात. रिक्त पदे भरण्यासंदर्भात शासनाकडे अनेक वेळा प्रस्ताव पाठविण्यात आले. पाठपुरावाही सुरू आहे; परंतु रिक्त पदांचा प्रश्न २ जूनपर्यंतही निकाली निघालेला नाही.