गुड मॉर्निंग पथक सक्रिय केव्हा होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:34 AM2021-07-25T04:34:10+5:302021-07-25T04:34:10+5:30
वाशिम तालुक्यातील दगड उमरा परिसरातील गट ग्रामपंचायत शेलगाव घुगेअंतर्गत दगड उमरा, जांभरून जहागीर, शेलगाव घुगे, ग्रामपंचायत बाभूळगाव, ग्रामपंचायत पार्डी ...
वाशिम तालुक्यातील दगड उमरा परिसरातील गट ग्रामपंचायत शेलगाव घुगेअंतर्गत दगड उमरा, जांभरून जहागीर, शेलगाव घुगे, ग्रामपंचायत बाभूळगाव, ग्रामपंचायत पार्डी आसरा आदी गावांमध्ये स्वच्छता अभियान नावालाच असल्याचे दिसून येत आहे. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत दगडउमरा परिसरात शौचालय बांधकामाची मोहीम राबविण्यात आली. घरी शौचालय असतानाही अनेक जण उघड्यावर शौचास जात असल्याचे दिसून येते. मध्यंतरी गुड मॉर्निंग पथकाने उघड्यावर शौचास जाणाऱ्यांना पकडून दंडात्मक कारवाई, तसेच समज दिली होती. कोरोनाच्या काळात खबरदारीचा उपाय म्हणून गुड मॉर्निंग पथकाची कारवाई मंदावली होती. आता कोरोनाची दुसरी लाट ओसरली असतानाही, गुड मॉर्निंग पथक सक्रिय झाले नाही. त्यामुळे दगडउमरा परिसरात उघड्यावर शौचास जाण्याचे प्रकार वाढीस लागल्याचे दिसून येते. गुड मॉर्निंग पथक पुन्हा सक्रिय व्हावे, असा सूर सूज्ञ नागरिकांमधून उमटत आहे.
०००
ग्रामीण भागातील शौचालये अडगळीत!
दगड उमरा परिसरातील अनेक लाभार्थींना शौचालय बांधकामासाठी शासनाकडून १२ हजारांचे अनुदान मिळाले आहे. घरी शौचालयेही आहेत, परंतु त्याचा नियमित वापर होत नसल्याचे दिसून येत आहे. काही शौचालये तर अडगळीत पडल्याचे दिसून येते. दरवाजे तुटले, तर काही शौचालये कुलूपबंद असल्याचेही दिसून येते.