आम्हाला घरकुल कधी मिळणार? ९५ हजार लाभार्थी रांगेत
By दिनेश पठाडे | Published: January 9, 2024 04:47 PM2024-01-09T16:47:40+5:302024-01-09T16:48:17+5:30
पीएम आवास योजनेच्या उद्दिष्टाची प्रतीक्षा.
दिनेश पठाडे,वाशिम : बेघर, कच्चे घर असलेल्या गरजू लाभार्थींना विविध योजनेतून घर बांधकामसाठी अर्थसहाय्य दिले जाते. पीएम आवास योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात आतापर्यंत २० हजार ३९७ घरकुलांना मान्यता देण्यात आली आहे. योजनेच्या प्रतीक्षा यादीत अजूनही ९५ हजार लाभार्थी आहेत. यंदा अजूनही उद्दिष्ट प्राप्त झाले नाही. त्यामुळे आम्हाला घरकुल कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
प्रधानमंत्री आवास योजना(ग्रामीण) अंतर्गत २०१६ पासून हजारो लाभार्थींना हक्काचे घर मिळाले आहे. या योजनेतून सर्वच घटकातील पात्र व्यक्तींना घरकुल बांधकामासाठी अर्थसहाय्य उपलब्ध होत आहे. सर्वसाधारण घटकातील लाभार्थी वगळता इतरांना राज्य शासनाच्या योजनेतून घरकुल मिळत असल्याने त्यांना दिलासा मिळत आहे. मात्र, सर्वसाधारण घटकातील व्यक्तींसाठी स्वतंत्र योजना नसल्याने त्यांना घरकुलाची प्रतीक्षा करावी लागत आहे.
त्यातच पीएम आवास योजनेचे देखील उद्दिष्ट मिळत नसल्याने घरकुल मंजूर होत नसल्याची स्थिती आहे. चालू आर्थिक वर्षात प्रधानमंत्री आवास योजनेचे उद्दिष्ट प्राप्त झाले नाही. उद्दिष्ट प्राप्त होताच तालुकानिहाय लक्षांक निर्धारित करुन त्यानंतर घरकुल मंजुरीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. प्रतीक्षेत असलेल्या हजारो लाभार्थींना उद्दिष्टाची प्रतीक्षा लागली आहे.