भाजप सरकारने कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा - राजू शेट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2018 07:59 PM2018-05-06T19:59:52+5:302018-05-06T20:00:04+5:30
आधीच्या आणि आताच्या सरकार नावाच्या व्यवस्थेने शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली आहे .
वाशिम - स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काढलेल्या "शेतकरी सन्मान अभियान"यात्रेने आज वाशिम जिल्ह्यात प्रवेश केला. यात्रेचा आजचा सहावा दिवस आहे. या यात्रेच जिल्ह्यात ठिकठिकाणी ग्रामस्थानी आणि शेतकऱ्यांनी जोरदार स्वागत केले. खासदार राजू शेट्टी यावेळी म्हणाले, "आधीच्या आणि आताच्या सरकार नावाच्या व्यवस्थेने शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली आहे . त्यामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हे अभियान सुरू केले आहे .
शेतकऱ्यांनो कर्जाला घाबरुन आत्महत्या करू नका, मी तुमच्या पाठीशी आहे, असा दिलासादायक विश्वास खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रबोधन होऊन त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होत असल्याचा अनुभव येतोय, असा आशावाद खासदार शेट्टींनी व्यक्त केला आहे. या अभियानाच्या निमित्ताने विदर्भ मराठवाड्यात फिरताना अनेक महिला मुले पाण्यासाठी वणवण पायपीट करत असल्याचे विदारक चित्र डोळ्याला दिसले,तरीही सरकारने अनेक तालुक्यात दुष्काळ जाहीर केला नाही.
अनेक ठिकाणी कर्जमाफीनंतर खरीपासाठी पीककर्ज मिळत नाहीत. गरज नसताना शेतमाल आयात केल्यामुळे शेतमालाचे भाव पडले आहेत ,ऐकूनच काय तर सरकार झोपले की काय अशी शंका येते अशी टीका राजू शेट्टी यांनी यावेळी व्यक्त केली. त्यामुळे शेतमालाला दीडपट हमीभाव आणि संपूर्ण कर्जमुक्ती झाल्याशिवाय सातबारा कोरा मी स्वस्थ बसणार नाही,असे ही खासदार राजू शेट्टी म्हणाले.