नेत्रहिन उल्हासला निरोप देताना कोरोना योध्यांचेही नेत्र पानावले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:44 AM2021-04-02T04:44:04+5:302021-04-02T04:44:04+5:30
वाशिम : ‘तो’ दोन्ही डोळ्यांनी अंध असल्याने सभोवताल कोरोना या महाभयंकर विषाणूने थैमान घातले असताना त्याला त्याचे काय गांभीर्य? ...
वाशिम : ‘तो’ दोन्ही डोळ्यांनी अंध असल्याने सभोवताल कोरोना या महाभयंकर विषाणूने थैमान घातले असताना त्याला त्याचे काय गांभीर्य? मात्र त्यालाही कोरोनाने हेरलेच. त्रास खूप बळावल्याने १५ दिवसांपूर्वी तो शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाला. त्यातील सहा दिवस तो ‘व्हेंटीलेटर’वर होता. यादरम्यान कोरोना योध्या परिचारिकांनी त्याची पोटच्या लेकराप्रमाणे सुश्रृषा केली. त्याचीही हिंमत दांडगी, म्हणून तो कोरोनावर यशस्वी मात करून ठणठणीत झाला. त्याला ३१ मार्च रोजी रुग्णालयातून निरोप देताना देवरूपी परिचारिकांचेही डोळे पानावले.
उल्हास चव्हाण या दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या युवकास साधारणत: १५ दिवसांपूर्वी कोरोना विषाणू संसर्गाची बाधा झाली. तीव्र ताप, घसादुखी आणि अशक्तपणामुळे तो नीट उभाही राहू शकत नव्हता. अशा गंभीर अवस्थेत त्याला वाशिमच्या स्त्री रुग्णालयातील कोविड केअर हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. अशात प्रकृती अधिकच ढासळल्याने त्याला चक्क सहा दिवस ‘व्हेंटीलेटर’वर ठेवावे लागले. वय कमी असल्याने आणि रोगप्रतिकारशक्ती चांगली असल्याने हळूहळू त्याच्या प्रकृतीत सुधारणा व्हायला लागली. कोरोना वॉर्डात नातेवाईकांना यायला परवानगी नाही. त्यामुळे आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णांच्या उपचारासाठी स्वत:ला झोकून देणाºया डॉक्टर्स व परिचारिकांनी नेत्रहिन उल्हासला कोरोनातून पूर्णत: बरे करण्यात कुठलीच कसर सोडली नाही. त्याला शौचास व लघवीला घेऊन जाणे, आंघोळ घालून देणे, कपडे घालून देण्यापर्यंतची सर्व काळजी त्यांनी घेतली. त्यांच्याच प्रयत्नाने अखेर १५ दिवसानंतर उल्हास ठणठणीत बरा होऊन घरी परतला. त्यापुर्वी त्याने डॉक्टर्स व परिचारिकांसोबत स्वत:चा फोटो काढण्याची इच्छा प्रदर्शित केली. ती देखील कोरोना योध्यांनी पूर्ण करून त्याला मानसिक बळ प्रदान केले. त्याला रुग्णालयातून निरोप देताना सर्वच परिचारिकांचे डोळे पानावल्याचे दिसून आले. (फोटो - ५)
......................
कोट :
दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या उल्हास चव्हाणला कोरोनाची बाधा झाली होती. संसर्गाचे प्रमाण तुलनेने अधिक होते. त्यामुळे त्याला सहा दिवस ‘व्हेंटीलेटर’वर ठेवावे लागले. यादरम्यान परिचारिकांनी त्याची काळजीपुर्वक सुश्रृषा केली. उपचारादरम्यान उल्हाससोबत परिचारिकांचे आगळेवेगळे नाते जुळले होते.
- डॉ. मधुकर राठोड
जिल्हा शल्य चिकित्सक, वाशिम