मानोरा शहरात देशी-विदेशी दारुची सर्रास विक्री
By admin | Published: May 10, 2017 01:19 PM2017-05-10T13:19:20+5:302017-05-10T13:19:20+5:30
शहरातील सर्वच दुकानातुन छुप्यामार्गाने देशी, विदेशी दारुची सर्रास विक्री होत असल्याचे चित्र आहे.
मानोरा : शासनाने काही दिवसापूर्वी रस्त्यापासून ५०० मिटर अंतराचे आतील देशी, विदेशी दारुचे दुकाने, बिअरबार बंद केले आहे. शासनाचे आदेशाने ही दुकाने बंद झाली असली तरी शहरातील सर्वच दुकानातुन छुप्यामार्गाने देशी, विदेशी दारुची सर्रास विक्री होत असल्याचे चित्र आहे.
मानोरा शहरात व शहरालगत पाच बिअरबार आहेत तर तीन दुकाने देशी दारुची आहेत. या सर्वच दुकानातुन छुप्या मार्गाने दारुची विक्री जादा भावात केली जात आहे. सुप्रिम कोर्टाने राज्य महामार्गावर ५०० मिटरच्या आत असणारी सर्व देशीविदेशी दारुची दुकाने बंद करण्याचा शासनाला आदेश दिला त्यावरुन शासनाने ही दुकाने बंद करण्याचा शासनाला आदेश दिला त्यावरुन शासनाने ही दुकाने बंद केली. ५०० मिटरच्या बाहेर किंवा जेथे राज्यमहामार्ग नाही तेथील दुकाने सुरु आहेत,मात्र राज्य महामार्गावर ५०० मिटरच्या आत असणारी दुकाने बंद असली तरी तेथे दुकानाच्या मागच्या बाजुने छुप्या मार्गाने पार्सल दिल्या जाते.
येथील सर्वच बारवर व देशी दुकानावर दिवसभर छुप्या पध्दतीने जादा भाव घेवुन दारु विक्री चालत असल्याने दारुबंदी होवुनही काही अर्थ उरला नाही. उलट पिणाऱ्यांना तीच दारु जादा भावाने विकत घ्यावी लात आहे. फक्त एक झाले बारमध्ये न बसता इतरत्र कुठे तरी बस्तान मांडुन प्यावे लागते एवढेच. काही प्रमाणात पिणारांचे प्रमाण कमी झाले असले तरी दारुची विक्री मात्र वाढली आहे. गावठी दारु गाळणाराकडे सुध्दा गर्दी वाढत आहे.पैसे कमी असणारे दारुडे देशी किंवा गावठी दारुवर आपला शौक भागवत आहे. याकडे संबंधीत विभाग व पोलिस प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी जनतेत केल्या जात आहे.
गामीण भागातही सर्रास दारुची विक्री
शहराप्रमाणे ग्रामीण भागातील कुपटा, इंझोरी, पोहरादेवी, शेंदुरजना अढाव आदि गावात धाब्यावर हॉटेलवर देशी,विदेशी दारुची सर्रास विक्री होत असल्याचे चित्र आहे. दारुबंदी विभाग व पोलिस प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष आहे की डोळेझाक, असा प्रश्न निर्माण होतो. नव्यानेच नियुक्त झालेल्या पोलिस अधिक्षक महोदयांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
शहरात तथा ग्रामीण भागात काही ठिकाणी छुप्या मार्गाने दारु विक्री होत असल्याचे कानावर आले. आमच्या परिने गस्त सुरु आहे. असे आढळल्यास आम्ही निश्चित कारवाई करु.- रामकृष्ण मळघने, ठाणेदार, मानोरा