१५ व्या वित्त आयोगातील खर्चात दिरंगाई कशासाठी?
By संतोष वानखडे | Published: July 11, 2024 05:48 PM2024-07-11T17:48:41+5:302024-07-11T17:49:15+5:30
प्रकल्प संचालकानी ५० ग्रामसेवकांना खडसावले: दालनात सुनावणी
संतोष वानखडे, वाशिम: पंधराव्या वित्त आयोगातील निधीचा खर्च शंभर टक्के करण्याचे निर्देश जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी गत महिन्यात दिल्यानंतरही जिलह्यातील ५० ग्रामपंचायतींनी दिरंगाई करीत ७० टक्क्यांपेक्षा कमी खर्च केला. या प्रकरणी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण गणेश कोवे यांनी १० जुलै रोजी सर्व संबंधित ग्रामसेवकांना खडसावत खर्चात दिरंगाई का, असा प्रश्न केला.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी मागील महिन्यामध्ये जिल्ह्यातील सर्व विकास अधिकारी (डी.ओ.) यांनी मॅरेथॉन आढावा सभा घेतली होती. त्या सभेत त्यांनी १५ व्या वित्त आयोगाच्या खर्चामध्ये उदासिनता खपवून घेणार नाही, असा इशारा दिला होता. तसेच ७० टक्के पेक्षा कमी खर्च झालेल्या ग्रामपंचायतींबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर ग्रामिण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण गणेश कोवे यांनी सहा तालुक्यामधील कमी खर्च असलेल्या ग्रामसेवकांना बोलावून त्यांची कान उघडणी केली. जिल्ह्यातील सहा तालुक्यामधील ३० टक्क्यांपेक्षा कमी खर्च असलेल्या तब्बल ५० ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांना आपल्या दालनात बोलावून त्यांची सुनावणी घेतली. यात ७० टक्क्यांपेक्षा कमी खर्च का अशी विचारणा करुन त्यांना कामात सुधारणा करण्याचे निर्देश दिले. कमी खर्च होण्याची कारणे जाणुन घेऊन १५ व्या वित्त आयोगामध्ये शंभर टक्के खर्च करण्याबाबतच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. यावेळी जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.