पतीच्या अपघाती निधनानंतर पत्नीचाही मृत्यू!
By admin | Published: June 2, 2017 01:28 AM2017-06-02T01:28:09+5:302017-06-02T01:28:09+5:30
चार चिमुकल्या मुलांचे छत्र हरविले : २८ मे रोजी झाला होता अपघात
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड : मेहकर-रिसोड मार्गावर २८ मे रोजी घडलेल्या अपघातात चंद्रकांत राठोड (रा.जवळा) यांचा मृत्यू झाला होता; तर गंभीर जखमी झालेल्या बेबी राठोड यांचा औरंगाबाद येथे बुधवार, ३१ मे रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे त्यांची चारही मुले उघड्यावर आली असून, गावावरही शोककळा पसरली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, की चंद्रकांत राठोड आणि त्यांची पत्नी बेबी राठोड हे दोघे २८ मे रोजी आपल्या दुचाकीने विवाह सोहळ्यावरून परत गावी येत असताना रात्री ९ वाजेच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने दुचाकीस जबर धडक दिली. यात दोघेही गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर रिसोड ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून औरंगाबादच्या रुग्णालयाकडे पुढील उपचारासाठी रवाना करण्यात आले; परंतु चंद्रकांत राठोड यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने आणि डोक्यातून सतत रक्तस्राव झाल्यामुळे त्यांची वाटेतच प्राणज्योत मालवली.
दरम्यान, चंद्रकांत राठोड यांच्या अचानक झालेल्या मृत्यूनंतर किमान बेबी राठोड यांचा तरी प्राण वाचावा, अशी अपेक्षा जवळा येथील समस्त गावकऱ्यांमध्ये व्यक्त होत होती; मात्र औरंगाबाद येथे उपचार सुरू असतानाच त्यांचेही ३१ मे रोजी निधन झाले.
या दुर्दैवी घटनेमुळे वडिलांच्या पाठोपाठ आईचेही छत्र हरविल्यामुळे चारही मुले पोरकी झाली आहेत.
दरम्यान, बेबी राठोड यांच्या पार्थिव देहावर गुरुवार, १ जून रोजी अत्यंत शोकाकुल वातावरणात जवळा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या चारही मुलांचा आक्रोश असह्य करणारा होता.