हिंस्त्र वन्यप्राण्यांचा लोकवस्तीलगत संचार वाढतोय!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2019 01:52 PM2019-01-10T13:52:09+5:302019-01-10T13:59:55+5:30
गेल्या काही महिन्यांपासून हिंस्त्र वन्यप्राण्यांचा लोकवस्तीलगत संचार वाढला आहे. अनेक ठिकाणी माणसांवर या हिंस्त्रप्राण्यांनी हल्लेही केले आहेत. त्यातून मानव-वन्यप्राणी संघर्ष निर्माण होत असल्याचे दिसत आहे.
वाशिम- गेल्या काही महिन्यांपासून हिंस्त्र वन्यप्राण्यांचा लोकवस्तीलगत संचार वाढला आहे. अनेक ठिकाणी माणसांवर या हिंस्त्रप्राण्यांनी हल्लेही केले आहेत. त्यातून मानव-वन्यप्राणी संघर्ष निर्माण होत असल्याचे दिसत आहे.
जिल्ह्यातील सहाही तालुक्यात प्रादेशिक वनविभागांतर्गत ३२० चौरस किलोमीटर क्षेत्रात प्रादेशिक वन विखुरले आहे. यात १८.३२१ चौरस किलोमीटर क्षेत्रावरा सोहळ काळविट अभयारण्याचे क्षेत्र संरक्षित आहे. वनविभागाच्यावतीने गत बुद्धपौर्णिमेच्या दिवशी पशूगणना कार्यक्रम राबविण्यात आला. या पशूगणनेनुसार वाशिमच्या प्रादेशिक वनपरिक्षेत्रातील वन्यप्राण्यांची संख्या अद्याप जाहीर झाली नाही. तथापि, जिल्ह्यातील वनपरिक्षेत्रात हरीण, नीलगाय, ससा, या प्राण्यांची संख्या लक्षणीय आहे. त्यातच बिबट, अस्वल या प्राण्यांचेही अस्तित्व आढळून आले आहे. जिल्ह्यात अनेक जातींचे हजारो पक्षी आणि सरपटणाºया जिवांची संख्याही लक्षणीय आहे; परंतु या प्राणी पक्ष्यांचे संरक्षण आणि संवर्धनासाठी वनविभागाकडून म्हणावे तसे प्रयत्न होताना दिसत नाही. जिल्ह्यातील जंगलाचे प्रमाण दिवसेंदिवस घटत असतानाच जलसाठ्यांची सोयही केली जात नसल्याने वन्यप्राणी चारापाण्याच्या शोधात अधिवासाबाहेर येत आहेत. जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांत मंगरुळपीर, कारंजा, मालेगाव या तीन तालुक्यांत मिळून १५ पेक्षा अधिक वेळा बिबट्याचे दर्शन शेतकरी, शेतमजुरांना घडले असून, यात ५ ते ६ घटनांत बिबट्याने माणसांवर हल्ले केल्याच्या घटनाही घडल्यात. त्याशिवाय या वन्यप्राण्यांनी पाळीवपशूंची शिकार केल्याच्या घटनाही घडल्या, या घटना मानव-वन्यजीव संघर्षाला जन्म देणाºया ठरल्या आहेत. असे असतानाही वनविभागाकडून आवश्यक उपाय योजना होत नसल्याचे दिसत आहे.
पाळीव पशू, मानवांवरील हल्ले चिंताजनक
जिल्ह्यात डिसेंबरच्या अखेर आणि जानेवारीच्या सुरुवातीला मंगरुळपीर तालुक्यात दाभा, वाढा आदिंसह अगदी मंगरुळपीर शहरलगत बिबट्याचे दर्शन लोकांना घडले. यात दोन घटनांत बिबट्याने माणसांवर हल्ला केल्याचे प्रकारही घडले. मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा परिसरात, तर वन्यप्राण्यांचे पाळीव पशू आणि मानवावर हल्ले करण्याच्या घटना वाढतच आहेत. बुधवार १० जानेवारी रोजी पुन्हा किन्हीराजा परिसरात बिबट्याने गाय ठार केल्याची घटना घडली, तर नोव्हेंबर महिन्यात कारंजा तालुक्यातही अशा घटना घडल्या. यातूनच मानव-वन्यजीव संघर्ष वाढीस लागत आहे.