टस्सल होणार की एकतर्फी ठरणार? उद्या निकाल, निवडणूक निकालाबाबतची उत्कंठा संपणार
By संतोष वानखडे | Published: June 3, 2024 07:48 PM2024-06-03T19:48:33+5:302024-06-03T19:48:44+5:30
जिल्ह्यातील रिसोड विधानसभा मतदारसंघ हा अकोला लोकसभा तर वाशिम व कारंजा विधानसभा मतदारसंघ हा यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहे.
संतोष वानखडे
वाशिम : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात प्रमुख उमेदवारांत टस्सल लढत झाली की मतदारांनी एकतर्फी कौल दिला, याचा फैसला ४ जून रोजी मतमोजणीतून होणार आहे.
जिल्ह्यातील रिसोड विधानसभा मतदारसंघ हा अकोला लोकसभा तर वाशिम व कारंजा विधानसभा मतदारसंघ हा यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपाचे अनुप धोत्रे, काॅंग्रेसचे डाॅ. अभय पाटील व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या तिरंगी लढत झाली तर लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात उद्धवसेनेचे संजय देशमुख व शिंदेसेनेच्या राजश्री पाटील यांच्यात थेट लढत झाली.
या दोन्ही लोकसभा मतदारसंघासाठी दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल रोजी मतदान झाले. मतदान झाल्यापासून कोण जिंकणार व कोण हरणार, यावरून एका महिन्यापासून केवळ आकडेमोड सुरू होती. आपलाच उमेदवार विजयी होणार, गुलाल आम्हीच उधळणार असे दावे, प्रतिदावे करण्यात आले. निवडणूक टस्सल झाली की एकतर्फी झाली, खासदार कोण होणार? याबाबत असलेली उत्सुकता ४ जून रोजी संपणार आहे. अकोला लोकसभा मतदारसंघाची मोजणी अकोला येथे तर यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाची मोजणी यवतमाळ येथे सकाळी ८ वाजतापासून सुरू होणार आहे. मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, दुपारपर्यंत निवडणुकीचे चित्र स्पष्ट होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
विधानसभा मतदारसंघनिहाय असे झाले होते मतदान
मतदारसंघाचे नाव / एकूण मतदार / मतदान / टक्केवारी
वाशिम / ३५६५७२ / २१५९४८ / ६०.५६
कारंजा / ३०६७३६ / १८७०४२ / ६०.९८
राळेगाव / २८१२६६ / १९३९७३ / ६८.९६
यवतमाळ / ३५७३५३ / २१२४८४ / ५९.४६
दिग्रस / ३३०२९७ / २२०००६ / ६६.६१
पुसद / ३०८६९२ / १९०७३६ / ६१.७९
कोणकोणत्या नेत्यांच्या झाल्या सभा?
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सभा तर सिनेअभिनेते गोविंदा यांचा रोड शो झाला. महाविकास आघाडीकडून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणूक जाहिर होण्यापूर्वी चार सभा घेतल्या होत्या. उमेदवारी अर्ज भरतेवेळी युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी सभा घेतली. त्यानंतर प्रत्यक्ष प्रचारात महाविकास आघाडीच्या स्थानिक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिकांनीच प्रचाराची संपूर्ण धुरा सांभाळली होती.