समुदाय वर्गाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकविणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 12:41 PM2020-08-28T12:41:22+5:302020-08-28T12:41:30+5:30
जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक हे समुदाय वर्गाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकविणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हा परिषद शिक्षकांनी गावातील चावडी, समाजमंदिर किंवा मोकळ्या जागेत समुदाय वर्गाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना (मोबाईल किंवा अन्य साधने नसणाऱ्या) शैक्षणिक अध्यापनाचे काम करण्याचे निर्देश जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी मंगळवारी जिल्ह्यातील सहा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाºयांना दिले.
कोरोना विषाणू संसर्गाचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला आहे. यामधून शिक्षण क्षेत्रही सुटू शकले नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, यासाठी आॅनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकविण्यात येत आहे. परंतू, ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल, संगणक, टॅब किंवा अन्य साधने नाहीत अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अशा विद्यार्थ्यांनादेखील शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अवर सचिवांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिलेल्या सूचनेनुसार, विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत सर्व शिक्षकांनी संबंधित शाळेत उपस्थित राहून आवश्यक ती खबरदारी घेत गावातील मोकळ्या जागेत, समाजमंदिर, चावडी, गावातील उपलब्ध सभागृह, क्रीडांगण आदी ठिकाणी पाच ते दहा विद्यार्थी मिळून ‘समुदाय वर्गा’च्या माध्यमातून शैक्षणिक अध्यापनाचे काम करावे लागणार आहे. सर्व शिक्षकांवर ही जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. समुदाय वर्गाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकविताना गर्दी होणार नाही, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता, विद्यार्थ्यांना शाळेत बोलावू नये आणि लॉकडाऊनच्या नियमाचे पालन करून कोरोना विषाणूचा संसर्ग वाढणार नाही, यासंदर्भात काळजी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. त्यानुसार जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक हे समुदाय वर्गाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकविणार आहेत.
ज्या विद्यार्थ्यांकडे आॅनलाईन शिक्षणासाठी मोबाईल किंवा अन्य साधने उपलब्ध नाहीत, त्यांना समुदाय वर्गाच्या माध्यमातून फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत शिकवावे, अशा सूचना गटशिक्षणाधिकाºयांना केल्या.
-अंबादास मानकर,
प्राथमिक शिक्षणाधिकारी