म्हैस विकून शौचालय बांधल्याबद्दल महिलेचा सत्कार
By admin | Published: June 16, 2017 01:26 PM2017-06-16T13:26:46+5:302017-06-16T13:26:46+5:30
म्हैस विकून शौचालय बांधल्याबद्दल प्रभाग क्र १५ मधील विधवा महिला सुशिला उत्तम गाभणे यांचा आज सत्कार करण्यात आला.
मालेगाव: म्हैस विकून शौचालय बांधल्याबद्दल प्रभाग क्र १५ मधील विधवा महिला सुशिला उत्तम गाभणे यांचा आज १६ जून रोजी सकाळी ९.०० वाजता सत्कार नगर पंचायतच्या वतीने करण्यात आला.
सुशीला गाभणे यांना शौचालय बांधकामासाठी नगर पंचायत कडून १७ हजार रुपये अनुदान मिळाले होते. एवढ्या रकमेत शौचालय बांधणे शक्य नव्हते; परंतु अर्ध्यावर बांधकाम सोडून शासनाच्या निधीचा अपव्यय करण्याऐवजी शौचालयांचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी म्हैस विकण्याचा निर्णय सुशिला गाभणे यांनी घेतला आणि म्हैस विकून शौचालय बांधले. त्याबद्दल त्यांचा सत्कार नगर पंचायतच्या अध्यक्षा मिनाक्षी परमेश्वर सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी गणेश पांडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बबनराव चोपडे, स्वच्छ भारत अभियानचे प्रदेश सचिव चव्हाण, नगर पंचायत मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते गजानन सारसकर, नगरसेवक संतोष जोशी, बाळासाहेब सावंत, कर्मचारी बाबू राऊत आदि उपस्थित होते. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे सुशिला गाभणे यांना २१०० रुपयाचा धनादेश सभापति बबनराव चोपडे यांच्या हस्ते देण्यात आला.