पाण्यासाठी महिलांची मंगरुळपीर नगरपालिकेवर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 04:39 PM2018-05-04T16:39:02+5:302018-05-04T16:40:25+5:30
मंगरुळपीर : मंगरुळपीर शहरात भीषण पाणी टंचाईने दिवसेंदिवस शहरातील नागरिक त्रस्त झाले असून, ४ मे रोजी शहरातील शेकडो महिलांनी थेट नगरपरिषद गाठून पिण्याच्या पाण्याची मागणी करीत आपला रोष व्यक्त केला.
मंगरुळपीर : मंगरुळपीर शहरात भीषण पाणी टंचाईने दिवसेंदिवस शहरातील नागरिक त्रस्त झाले असून शहरातील पाणी टंचाई संदर्भात जिल्हा प्रशासनाबरोबरच लोकप्रतिनिधींचीही तेवढीच उदासिनता असल्याने शहरवासियांना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे. याच्या निषेधार्थ ४ मे रोजी शहरातील शेकडो महिलांनी थेट नगरपरिषद गाठून पिण्याच्या पाण्याची मागणी करीत आपला रोष व्यक्त केला.
मंगरुळपीर शहराला पाणी पुरवठा करणारा मोतसावंगा प्रकल्प पूर्णत: कोरडा पडला . यामुळे मंगरुळपीर शहरातील नगरपरिषदेचा पाणी पुरवठा अनेक दिवसांपासून बंद आहे. अशामध्येच हातपंप व विहिरी सुध्दा कोरडया पडल्यामुळे शहरातील नागरिक पाण्यासाठी चोहीकडे भटकंती करीत आहेत. मंगरुळपीर शहराला शासन स्तरावरुन नागरीक पाण्यासाठी चोहीकडे भटकंती करीत आहे. मंगरुळपीर शहराला शासन स्तरावरुन साडे चार कोटी रुपयांची सोनाळा प्रकल्पावरुन तात्पुरत्या स्वरुपाची पाणी पुरवठा योजना मंजुर झाली होती. आणि ती १५ मे पर्यंत कार्यान्वित करायची होती. परंतु काही अडचणीमुळे वाशिम जिल्हाधिकाºयांनी या योजनेला स्थगिती दिल्यामुळे नगरपरिषद प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे टँकर करीता प्रस्ताव पाठविला होता, परंतु अजुनपर्यंत वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मंगरुळपीर शहरातील टँकरसाठी मंजुरी आदेश दिला नसल्याचे कळते. यावरुनच वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय मंगरुळपीर शहरातील पिण्याच्या पाण्यासंदर्भात किती गंभीर आहे हे दिसून येते. मंगरुळपीर शहराला सोनाळा प्रकल्पातून तात्पुरत्या स्वरुपात पाणी पुरवठा व्हावा याकरिता शासनाकडून साडेचार कोटी रुपयांची योजना मंजुर झाली,मात्र या योजनेला तत्कालीन जिल्हाधिकाºयांनी स्थगिती दिली व ती पुन्हा २७ एप्रिलला उठविली. असे पत्र मंगरुळपीर नगर परिषदेला २ मे रोजी प्राप्त झाले. ज्या योजनेला पूर्ण करण्याकरिता किमान दीड महिन्याचा कालावधी लागतो आता ती योजना अवघ्या १३ दिवसात कशी पूर्ण होई असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरात मागील एक महिन्यापासून पाणी टंचाई नागरिकांना भेडसावित आहे. अशातच जिल्हा प्रशासनाची ही उदासिनता शहरातील नागरिकांचा गळा कोरडा करीत आहे. स्थानिक आमदारांनी याबाबत एक आढावा बैठक घेवून व ३ लाख रुपयांचा निधी देवून आपल्या कानावर हात ठेवले व परत येवून बघितले सुध्दा नाही. असेच चालले तर शहरातील जनतेने काय करावे असा सवाल ही सध्या नागरिक करीत आहेत.
आम्ही शहरात पाणी पुरवठा करण्याकरिता प्रशासनाकडे पाणी टँकरसाठी प्रस्ताव पाठविला आहे. तो मंजुर होताचक्षणी शहरात टँकरने ताबडतोब पाणी पुरवठा केला जाईल. तसेच सोनाळा प्रकल्पावरुन तात्पुरती पाणी पुरवठा योजनेला आम्ही शासनाकडे मुदत वाढीची मागणी केली आहे.
- डॉ. मेघना वासनकर, मुख्याधिकारी, नगरपरिषद मंगरुळपीर