पाणंद रस्त्यासाठी महिला धडकल्या तहसिल कार्यालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 05:27 PM2021-07-21T17:27:55+5:302021-07-21T17:28:03+5:30
Washim News : सुरकंडी येथिल शेतकरी महिलांनी २० जुलै रोजी वाशिम तहसील कार्यालयात धडक दिली.
वाशिम : पांदण रस्ता पूर्णपणे चिखलाने माखल्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता देण्याच्या मागणीसाठी वाशिम तालुक्यातील सुरकंडी येथिल शेतकरी महिलांनी २० जुलै रोजी वाशिम तहसील कार्यालयात धडक दिली.
सुरकंडी येथील दगड उमरा या गावाकडे जाणाऱ्या पांदण रस्त्याचे भिजत घोंगडे वर्षानुवर्षापासून रेंगाळलेले आहे. या पांदण रस्त्यावरून अनेक शेतकऱ्यांना जावे लागते. सद्यस्थितीत या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे. त्यामुळे शेतात जायचे कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सद्यस्थितीत शेतातील निंदनाचे कामे सुरू आहेत. रस्त्याअभावी शेतीची कामे प्रभावित होत आहेत. पांदण रस्ता विनाविलंब दुरुस्त करून द्यावा, अशी मागणी महिलांनी तहसीलदारांकडे केली. तहसील, पोलीस प्रशासन तसेच ग्रामपंचायतच्या समन्वयाने हा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा असा सूर महिलांमधून उमटत आहे.
००००
... तर आंदोलनाचा इशारा
पाणंद रस्त्याअभावी शेतकऱ्यांना शेतात जाणे कठीण झाले आहे. हा प्रश्न निकाली निघत नसल्याचे पाहून महिलांनी आक्रमक पवित्रा घेत पांदण रस्त्याचा प्रश्न तात्काळ मार्गी न लागल्यास मोठे आंदोलन उभारू असा इशारा महिलांनी दिला.